मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालासाठी चांगल्या प्रकारे बाजारपेठ उपलब्ध व्हावी व त्यानुसार नेहमी त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोत वाढवण्याच्या अनुषंगाने प्रयत्न होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हिंगोली अंतर्गत दि. 29 मार्च ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये बचत गटाने उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने कयाधू जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करुन उद्घाटन करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी ग्रामीण भागातील महिलांनी नाविन्यपूर्ण व्यवसाय करून त्यांच्या जीवनमानाचा स्तर वाढवावा, असे मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी गटांना मिळालेल्या शासन निधी व बँक कर्ज यामधून नवनवीन व्यवसायाच्या संधी शोधून त्यानुसार आपला गट आर्थिक उन्नती कडे मार्ग क्रमण करावे, असे सांगितले.
सर्व मान्यवरांनी हिंगोली करांना ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाची जास्तीत जास्त खरेदी करुन गरीब कुटुंबांना हातभार लावावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सारस्वत, अरुण बोधनकर, तालुका आरोग्य अधिकारी नामदेव कोरडे, अग्रणी बँक व्यवस्थापक सावंत, आरसेटीचे संचालक बोईले, ओम प्रकाश गलांडे, राम मेकाले, राजू दांडगे, घोगरे , गणेश पाटील व सर्व तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक सर्व समुदाय संसाधन व्यक्ती उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सारस्वत यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा व्यवस्थापक राजू दांडगे यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्रीराम मेकाले यांनी केले.