मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – सेनगाव तालुक्यातील आडोळ येथील गट क्रमांक 52 मधील शेत जमीन असणाऱ्या गोरगरीब आदिवासी व बौद्ध समाज बांधवांना येथून बेदखल करत संबंधित जमीन हस्तगत केली, मात्र गट क्रमांक 22, 23, मधील अतिक्रमणाला साधा हात देखील लावला नाही.
सेनगाव वन विभागाने हा पक्षपातीपणा कशासाठी केला याची चौकशी करावी व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील गोरगरीब आदिवासी व बौद्ध समाजातील पीडित शेतकऱ्यांतून केली जात आहे.
सेनगाव येथील वन विभागाचा भोंगळ कारभार सर्वत्र चर्चेत आहेच त्यात आता वन विभागाचा पक्षपातीपणा देखील चव्हाट्यावर आला आहे. तालुक्यातील आडोळ येथील गट नंबर 22 23 व 52 हे सेनगाव वनविभागाचे आहे. यातील गट क्रमांक 52 यावर गावातील गोरगरीब आदिवासी व बौद्ध समाजातील शेतकरी जमीन कसून आपला उदरनिर्वाह करत होते.
मात्र, या शेतकऱ्यांना सेनगाव वन विभागाने नोटीसा बजावत अतिक्रमण काढून घ्यावे अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा देत काही दिवसांचा अवधी दिला.
या शेतकऱ्यां वर कारवाईची भीती दाखवत सेनगाव वन विभागाने या शेतकऱ्यांचे अतिक्रमण हटवून त्यांना भूमिहीन केले आहे. यात काही शेतकऱ्यांच्या शासनाकडून त्यांना मिळालेल्या विहिरी देखील गेलेल्या आहेत.
सध्या या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यांना कसण्यासाठी शेतीच नसल्याने त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे तर दुसरीकडे याच गावातील गट क्रमांक 22 व 23 वर अनेकांचे अतिक्रमण असून सेनगाव वनविभागाने त्यास हात देखील लावला नाही.
संबंधित जमिनी ह्या सेनगाव येथील काही धनाड्य लोकांच्या असल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्या जमिनींना सेनगाव वन विभागाने धक्का न लावता गोरगरीब कष्टकरी आदिवासी व बौद्ध समाजातील शेतकऱ्यांचे अतिक्रमण काढून त्यांना भूमिहीन केले आहे.
या सर्व प्रकरणाची हिंगोली येथील विभागीय वनाधिकारी यांनी चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी गावातील पीडित शेतकरी करत आहेत.
पूर्णा नदी काठावरील जैवविविधता नष्ट!
काही दिवसांपूर्वीच चला जाणूया नदीला हा उपक्रम व अभियान जिल्ह्यात राबविले जात आहे. नदी काठावरील जैवविविधता जोपासणे व संरक्षण करणे असे या अभियानाचे उद्दिष्ट आहे, मात्र सेनगाव तालुक्यातील आडोळ येथील गट क्रमांक 22 व 23 ला लागून पूर्णा नदी वाहते. सदरील गटात आढळ व सेनगाव येथील काही धनदांडग्यांच्या जमिनी असून या धनदांडग्यांनी सेनगाव वन विभागाचे हे क्षेत्र शेतीसाठी उपयोगात आणल्याने येथील मोठ्या प्रमाणातील जैवविविधता नष्ट झाली आहे. सेनगाव विभागाच्या पक्षपातीपणामुळे हे घडलेले असून संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांवर तसेच सेनगाव वनविभागातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांतून व ग्रामस्थांतून होऊ लागली आहे.