मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – ऑटो रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशास रिक्षा थांबवून त्याच्या जवळील पन्नास हजार रुपये घेऊन जाणाऱ्या आरोपींचा अवघ्या काही तासात हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने शोध घेऊन त्यांना जेरबंद केले आहे.
1 एप्रिल रोजी 3 वाजेच्या सुमारास ऑटोरिक्षा मध्ये बसून जात असलेल्या फिर्यादीस ऑटो चालकाने त्याच्या इतर दोन साथीदारासह हिंगोली येथील चौधरी पेट्रोल पंपा समोर रोडवर जबरदस्तीने फिर्यादीच्या खिशातील नगदी 50 हजार रुपये काढून घेऊन गेले.
यावरून हिंगोली येथील शहर पोलीस ठाण्यात भादविनुसार गुन्हा दाखल झाला होता. या अनुषंगाने हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सूचना देऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले.
यावरून हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन फिर्यादीस विचारपूस केले असता फिर्यादी कडून संशयित आरोपीचे अंगावरील कपडे त्यांची बोलीभाषा याबाबत माहिती घेतली.
घटनास्थळाजवळील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून संशयित आरोपी बाबत माहिती काढली मिळालेल्या माहितीवरून सदरील आरोपींचा शोध घेण्यासाठी गोपनीय बातमीदारांना सीसीटीव्ही फुटेज व आरोपी बाबत माहिती दिली असता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा गजानन हांडे, वैजनाथ चव्हाण व भिकाजी काळे यांनी केला आहे. सदरील आरोपी हे इंदिरा गांधी चौक येथे एका ऑटो मध्ये बसलेले आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव गजानन ज्ञानबा हांडे (वय 42 वर्षे, व्यवसाय ऑटोचालक रा. हमालवाडी हिंगोली), वैजनाथ उर्फ वैजू बबन चव्हाण (वय 22 वर्षे व्यवसाय मजुरी रा. पारधीवाडा हिंगोली), भिकाजी उर्फ भैरा जगन काळे (वय 28 वर्ष व्यवसाय मजुरी रा. पारधीवाडा हिंगोली) असे सांगितले. त्यांना विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून गुन्ह्यातील गेलामाल नगदी 50 हजार रुपये व गुन्हा वापरलेला तीन चाकी ऑटोरिक्षा असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांना पुढील तपासकामी हिंगोली येथील शहर पोलीस ठाण्यात हजर केले आहे.
ही कार्यवाही हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंडित कचवे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, पोलीस अंमलदार नितीन गोरे, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले, प्रमोद थोरात, नरेंद्र सावळे, स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांच्या पथकाने केली आहे.