मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / जगन वाढेकर :-
सेनगाव – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक लोकशाही पद्धतीने पार पडली. निवडणुकीचा निकाल मतदान घेतल्यानंतर सायंकाळीच लागला. आता या निवडणुकीनंतर 22 मे रोजी सभापती, उपसभापती निवडीसाठी सभा घेण्यात येणार आहे. या पदासाठी अनेक जण इच्छुक असल्याचे दिसते.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हिंगोली यांच्या कार्यालयीन आदेशान्वये कृषी उत्पन्न बाजार समिती सेनगाव च्या सभापती व उपसभापती पदाची निवड करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती सेनगाव तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था हिंगोली वैभव हजारे यांची निवड झालेली आहे.
उपरोक्त आदेशाच्या अधीन राहून कृषी उत्पन्न बाजार समिती सेनगाव या बाजार समितीवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांमधून समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी 22 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती सेनगावच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती ची निवड करण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
यानुसार 22 मे रोजी सकाळी साडे अकरा ते बारा या वेळेत नामनिर्देशन पत्र वाटप व स्वीकृती, बारा ते सव्वा बारा यादरम्यान नामनिर्देशन पत्र छाननी, दुपारी साडेबारा वाजता वेळ नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्धी, दुपारी साडेबारा ते पावणे एक वाजेच्या दरम्यान नामनिर्देशन पत्र माघार, दुपारी एक वाजता अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करणे, दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान मतदान प्रक्रिया (आवश्यकता भासल्यास), मतदान संपल्यानंतर मतमोजणी प्रक्रिया आणि मतमोजणी नंतर लगेच निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत निकाल घोषित करणे, असा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
सभापती व उपसभापती पदासाठी अनेक सदस्यांनी फिल्डिंग लावली असून काहींनी पक्षश्रेष्ठी सांगेल तो आदेश मानला जाईल अशी भूमिका घेतली आहे. सभापती, उपसभापती पदाच्या घोडेबाजार होण्याचीही शक्यता आहे. या पदासाठी काही मुरलेले राजकीय मातब्बर इच्छुक असल्याचे दिसते हे दोन्ही पद कोणाच्या वाटेला येते हे पाहणे गरजेचे आहे.