मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / जगन वाढेकर :-
सेनगाव – आषाढी एकादशी निमित्त शेगावीचे श्रीगजानन महाराज यांची पालखी शेगाव येथून पंढरपूर कडे रवाना झालेली आहे. या पालखीचे मराठवाड्यात आगमन झाले असून मार्गावरील सेनगाव शहरात ही पालखी टाळ मृदंगाच्या गजरात दाखल झाली आहे. पालखीमुळे सेनगाव शहरास प्रति पंढरपूरचे स्वरूप आले आहे.
आषाढी वारीसाठी विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत श्रीगजानन महाराज यांच्या पालखीचे शेगाव येथून पंढरपूरसाठी प्रस्थान झाले आहे.
यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून श्रींची पालखी मध्ये भक्त ‘गण गण गणात बोते’च्या गजरात जवळपास ७५० किलोमीटरचा प्रवास ३० ते ३१ दिवसांमध्ये ही वारी पूर्ण करणार आहेत.
यंदा वारीचे ५४ वे वर्ष आहे. प्रथा-परंपरेनुसार यंदाही ज्येष्ठ शुद्ध सप्तमीच्या दिवशी सकाळी बँड पथक, ढोल नगारे, तुतारी, टाळ मृदंगाच्या निनादात वाजत-गाजत श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. 5 जून रोजी या पालखीचे सेनगाव येथे आगमन झाले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखीच्या स्वागतासाठी सेनगाव शहर सज्ज झाले होते.
श्रींच्या पालखीचे दरवर्षी सेनगाव येथे मुक्काम असतो. हा मुक्काम जिल्हा परिषद शाळा येथे असतो. त्यामुळे शहरातील सर्व नागरिक श्रींच्या पालखीच्या स्वागतासाठी शहराची साफसफाई कच्च्या रस्त्याची डागडुजी श्रींच्या पालखीसाठी लाइटिंग मंडप डेकोरेशन या सर्व देखावे करण्यासाठी शहरातील मंडळींनी कंबर कसली आहे.
श्रींची पालखी सेनगाव येथे मुक्कामी असल्यामुळे पुन्हा एकदा शहराला प्रति पंढरपूर स्वरूप आले. गण गणात बोतेच्या गजरात भगव्या पताकाधारी वारकऱ्यांसह एका गणवेशात, टाळ मृदंगाच्या निनादात पाऊली करत शिस्तीचे दर्शन घडवून आणले.
वीस ते पंचवीस हजार बुंदीच्या पाकिटांचा प्रसाद होणार वाटप
शहरातील काही मंडळीं बऱ्याच वर्षापासून प्रसाद वाटण्याची परंपरा कायम ठेवीत यावर्षीही बुंदींचा प्रसादाचे वीस ते पंचवीस हजार पाकिटांचे वाटप होणार असल्याचे बोलले जात आहे.
नगरपंचायत मार्फत कच्च्या रस्त्याची डागडुजी
जिल्हा परिषद शाळेमध्ये श्रींच्या पालखीचा मुक्काम होणार असल्यामुळे जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात साफसफाई काम करण्यात आले. त्या ठिकाणी मंडप लाइटिंग चा देखावा व शहरातील मुख्य कच्च्या रस्त्याची डागडुजी नगरपंचायत मार्फत करण्यात आली.