मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – संपूर्ण देशभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दि. 01 एप्रिल, 2023 पासून महिला सम्मान बचत पत्र योजनेची सुरुवात केली आहे. परभणी विभागामधील सर्व डाक कार्यालयामध्ये महिला सम्मान बचत पत्र योजना खाते उघडण्याचे विशेष अभियान दि. 30 जून, 2023 पर्यंत सुरु आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि महिलांची आर्थिक गुंतवणूक वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने महिला सम्मान बचत पत्र योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत डाक कार्यालयात आर्थिक गुंतवणूक केल्यास 7.5 टक्के व्याज मिळणार आहे. शिवाय हे व्याज चक्रवाढ पध्दतीने असणार आहे. त्यामुळे महिलांना भरपूर आर्थिक लाभ होणार आहे.
महिला सम्मान बचत पत्र ही योजना महिला आणि मुलींच्या आर्थिक प्रगतीसाठी आहे. एका मुलीच्या नावावर अथवा मुलीच्या वतीने तिच्या नावावर तिचे पालक बचत पत्र घेऊ शकतात. या योजनेची मुदत दोन वर्ष आहे. या योजनेत किमान एक हजारापासून ते दोन लाखापर्यंत गुंतवणूक करता येते.
एका महिलेच्या नावावर कमाल दोन लाखापर्यंत कितीही बचत पत्र घेता येतील. परंतु दोन खात्यात किमान तीन महिन्याचे अंतर असले पाहिजे.
योजनेची ठळक वैशिष्ट्ये :
या योजनेमध्ये महिला एक हजार रुपये ते दोन लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करु शकतात. या खात्यांतर्गत गुंतवणूक केल्यास 7.5 टक्के दराने व्याज मिळते. खाते उघडल्यापासून एक वर्षानंतर गरज पडल्यास 40 टक्के रक्कम केवळ एकदाच काढता येते. खात्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खात्यातील एकूण रक्कम व्याजासहित काढून ते खाते बंद करता येते.
आवश्यक कागदपत्रे :
योजनेचा डाक कार्यालयातील विहित नमुन्यातील अर्ज, मुलीचे आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड व पॅन कार्ड (अ.पा.क. असल्यास) मुलीचे व पालकांचे दोन फोटो व रहिवाशी पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रे, महिला अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड व दोन फोटो आवश्यक आहेत.
योजनेची सर्व माहिती परभणी विभागातील नजीकच्या प्रत्येक डाकघर कार्यालयात उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिसेसमध्ये हे खाते सहज उघडता येईल. सर्व महिलांनी (वयाची अट नाही) आपल्या आर्थिक प्रगतीस हातभार लावण्यासाठी आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये दि. 30 जून, 2023 पर्यंत खाते उघडून चालू असलेल्या विशेष मोहिमेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मोहम्मद खदीर, अधीक्षक, डाकघर, परभणी यांनी केले आहे.