मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील वाई – तरोडा रोडवर विनापरवाना तोड करून साठवून ठेवलेले अडजात प्रजातीचे लिंब व आंबा जप्त करण्यात आला. ही कार्यवाही हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार व त्यांच्या पथकाने केली. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.
हिंगोली वनपरिक्षेत्रात मागील कित्येक वर्षांपासून अवैध व विनापरवाना वृक्षतोड सुरू होती. यामुळे हिंगोली वनपरिक्षेत्रात झाडांचे प्रमाण कमी होत होते; मात्र वन अधिकारी मीनाक्षी पवार यांनी हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी पदाचा पदभार घेतल्यापासून त्यांनी मोठ्या प्रमाणात अवैध व विनापरवाना वृक्षतोडीस आळा घातला आहे.
कळमनुरी तालुक्यातील वाई – तरोडा रोडवर असलेल्या शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृह समोरील मोकळ्या जागेत विनापरवाना अडजात प्रजातीचे लिंब, आंबा ज्याचे परिमाण चार घनमीटर आहे एवढा माल विनापरवाना तोड करून वाहतूक करून साठवून ठेवण्यात आला होता.
या ठिकाणी हिंगोली वनपरिक्षेत्राधिकारी मीनाक्षी पवार व त्यांच्या पथकाने 22 जून रोजी छापा मारून या अडजात लाकडावर जप्ती संतक क्र.HNL/B-2 उमटवून उमटवून रीतसर कार्यवाही करण्यात आली.
याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांचीही 16 वी कार्यवाही आहे.
ही कार्यवाही हिंगोली येथील सहाय्यक वनसंरक्षक तथा विभागीय वनाधिकारी सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल तोलसरवाड वनरक्षक काशीदे, जाधव, शिखरे, क्षीरसागर यांनी केली.