मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नरसी नामदेव येथील संतश्रेष्ठ नामदेव महाराज, औंढा नागनाथ येथील गोकर्णश्वर महादेव, हिंगोली शहरातील देवडा नगर श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. रांगेत उभे राहून यावेळी भाविकांनी दर्शन घेतले. यानिमित्त कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांनी गोकर्ण माळावर चढाई करत स्वतः आमदार असतानाही सर्वसामान्यांसारखे त्यांच्यासोबत उभे राहू रांगेत उभे राहून सपत्नीक दर्शन घेतले.
महाराष्ट्राचे लाडके दैवत श्रीविठ्ठल – रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे दिंड्या रवाना झाल्या होत्या.
हिंगोली जिल्ह्यातूनही विविध ठिकाणाहून वारकरी भाविकांच्या दिंड्या पंढरपूरकडे रवाना झालेले आहेत. यामध्ये मानाचे दिंडी म्हणून संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांची दिंडी पंढरपूर येथे पोहोचली आहे.
या सर्व दिंड्या तहानभूक हरवून विठ्ठलाचे नाव घेत ऊन, वारा, पाऊस झेलत विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूर येथे दाखल झालेले आहेत. देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी या सर्व दिंड्या, दिंडेकरी, वारकरी भाविकांनी श्रीविठ्ठल – रुक्मिणीचे दर्शन घेतले.
हिंगोली येथे आषाढी एकादशीनिमित्त शहरातील देवडा नगर येथे असलेल्या श्रीविठ्ठल – रुक्मिणी च्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. भाविकांनी रांगेत उभे राहून श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. आलेल्या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले.
तसेच औंढा नागनाथ येथील गोकर्ण माळरानावर असलेल्या गोकर्णश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांनी सपत्नीक गोकर्ण माळावर चढाई करत रांगेत उभे राहून दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार वैजनाथ भालेराव, नगराध्यक्ष सपना कनकुटे, उपनगराध्यक्ष दिलीप राठोड, उपसभापती अनिल देशमुख, तालुका प्रमुख साहेबराव देशमुख, शहर प्रमुख अनिल देव, शिवसेना नेते राम नागरे, रुग्ण कल्याण समिती सदस्य माधव गोरे, माजी नगराध्यक्ष कपिल खंदारे, सचिन राठोड यांच्यासह नगरसेवक व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी औंढा नागनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीनागनाथांचेही भाविकांनी दर्शन घेतले. आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले नरसी नामदेव येथे भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली.
नरसी नामदेव येथे संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी हिंगोली जिल्ह्यासह मराठवाडा व राज्यातील अनेक ठिकाणाहून वारकरी भाविकांनी पायी चालत येऊन रांगेत उभे राहून विठ्ठल नामाचा जयघोष करत, भजन आदी गात संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचे दर्शन घेतले.
यावेळी रांगेतील भाविकांना प्रथमदर्शनाचा यावर्षीचा मान कल्पना गणेश तडस, गंगाबाई माधव वानखेडे यांना मिळाला. यानिमित्त मंदिर प्रशासनाकडून आलेल्या भाविकांसाठी प्रसाद व फराळाचे वाटप करण्यात आले.