मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर, सतीश खिल्लारी :-
सेनगाव – छत्रपती संभाजी नगर येथून हिंगोली कडे भरधाव जाणारी कार ही सेनगाव लगत असलेल्या एका शेडमध्ये घुसली या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. सेनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमी व्यक्तीला पुढील उपचारासाठी हिंगोली येथे हलविण्यात आले आहे.
5 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
छत्रपती संभाजीनगर येथून हिंगोली कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ईरटीका कार क्रमांक एम एच 16-एटी 6710 च्या चालकाचे नियंत्रण सुटून कार चक्क शेडमध्ये घुसली. यात शेडमध्ये झोपलेल्या नामदेव हागे यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा नातू गोपाल हा गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व मयताचा मृतदेह सेनगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. जखमी गोपाल यास उपचारासाठी हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सेनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात येत असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.