मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील रहिवासी असलेल्या पुष्यमित्र जोशी यांची प्रतिष्ठित व अत्युच्च काठिण्य पातळी असणाऱ्या मुखर्जी फेलोशिपसाठी निवड झाली आहे. संपूर्ण भारतातून ५००० पेक्षा अधिक युवकांनी या फेलोशिपसाठी अर्ज सादर केले होते. त्यापैकी केवळ ५० युवकांची निवड करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत उत्तीर्ण करून फेलोशिपसाठी अंतिम यादी नुकतीच जाहीर करण्यात आली.
ही फेलोशिप रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, नेशन फर्स्ट थिंक टँक व पब्लिक पॉलिसी अँड गव्हर्नन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात निवड झालेले ५० तरुण दिल्लीमध्ये संसद, लोकप्रतिनिधी, विविध केंद्रीय मंत्री व मंत्रालये, शासकीय धोरणे तयार करणे यासाठी मदत करणार आहेत.
पुष्यमित्र जोशीला वैज्ञानिक व समजोपयोगी संशोधनासाठी ओळखल्या जाते. त्याला महामहीम राज्यपाल (राजभवन) द्वारे संशोधनासाठी फेलोशिप मिळाली होती. त्यांच्या कार्याबद्दल महाराष्ट्राच्या राज्यपालांनीदेखील त्याचे कौतुक केले होते. त्यांनी आजपर्यंत १० पेक्षा अधिक वैज्ञानिक परिषदांचे विजेतेपद पटकावले आहे. त्याचप्रमाणे त्याचे १५ रिसर्च पेपर (शोधनिबंध) आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे विजेतेपददेखील पुष्यमित्रने मिळवले होते.
नुकत्याच झालेल्या क्रीडा व युवक मंत्रालय भारत सरकार व नेहरू युवा केंद्राद्वारे आयोजित युवा उत्सव कार्यक्रमाचे विजेतेपद देखील पुष्यमित्रला मिळाले आहे. पुष्यमित्र जोशी सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएच.डी. करत असून संशोधक व उत्तम वक्ता म्हणून ओळखल्या जातो.
विविध कार्यक्रमात आपल्या अष्टपैलू शैलीने स्थान मिळवणाऱ्या पुष्यमित्र जोशीने अनेक शैक्षणिक, संशोधन व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपली छाप उमटविली आहे.
एकूणच शैक्षणिक पात्रता, कार्यकुशलता या सर्वांना नजरेसमोर ठेऊन आयोजकांनी पुष्यमित्रची सदर फेलोशिपसाठी निवड केली आहे.