मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क/ संतोष अवचार :-
हिंगोली – दोन महिन्यांपूर्वी पाच हजार रुपये क्विंटल विकणाऱ्या हळदीला आता चांगलाच भाव आला आहे. हळदीने द्विअंकी आकडा पार केला असून वसमत येथील बाजारपेठेत हळदीला सर्वाधिक म्हणजेच 15000 रुपयांचा दर मिळाला तर हिंगोली येथे कांडी हळदीला दहा हजार दोनशे पाच रुपयांचा भाव मिळाला.
गेल्या खरीप हंगामातील सोयाबीनला बाजारपेठेत म्हणावा तसा भाव मिळाला नाही. कधी साडेचार हजार रुपये तर कधी पाच हजार रुपये असा दर सोयाबीनला मिळाला. त्याच्या आदल्या वर्षी सोयाबीनने 10 हजार रुपयांचा आकडा पार केला होता.
यंदा मात्र सोयाबीन पाच हजार रुपयांवरच अडकली शेतकऱ्यांच्या तुरीला मात्र नऊ हजार रुपये ते दहा हजार रुपये असा भाव मिळाला. तसेच त्या खालोखाल भुईमुगाला भाव मिळाला. त्यानंतर सध्या मार्केटमध्ये आलेल्या हळदीला काही दिवसांपूर्वी पाच हजार रुपये तर कधी साडेपाच हजार रुपये असा दर मिळू लागला.
पाच हजार आठशे रुपये असा सर्वाधिक दर काही दिवसांपूर्वी हळदीला मिळाला; मात्र आता हळदीने द्वियांकी आकडा पार केला असून हिंगोली येथील बाजारपेठेत इंचा येथील शेतकरी साहेबराव डोलारे यांच्या कांडी हळदीला 10 हजार 205 रुपये असा दर मिळाला.
सर्वाधिक दर वसमत येथील बाजारपेठेत हळदीला प्राप्त झाला. या बाजारपेठेत हळदीला 15 हजार असा भाव मिळाला.
हळदीला सोन्याचा दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त होत आहे. हळदीचे दर वाढण्याची शक्यता आहे.