Marmik
Hingoli live

खाजगी दवाखान्यांनी संशयित डेंगू व हिवतापाचा रुग्ण शासकीय यंत्रणेस कळवावा – जिल्हा हिवताप अधिकारी

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यातील खाजगी दवाखान्यांनी त्यांच्याकडील संशयित डेंग्यू व हिवतापाचा रुग्ण शासकीय यंत्रणेस कळवावा असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे.

किटकजन्य आजारांमध्ये डेंग्यु व हिवताप या आजारांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर दिसून येत आहे. या आजाराचे निश्चित निदान वेळेत होऊन उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. भारत सरकारने 2023 पर्यंत हिवताप दुरीकरणाचे उदिष्ट निश्चित केले आहे.

भारत सरकारने तयार केलेल्या आराखडयानुसार 2027 पर्यंत हिवताप प्रवन क्षेत्रामध्ये हिवतापाचे रुग्ण शून्य करणे व 2030 पर्यंत हिवताप दूरीकरण करण्याचे उदिष्ट आहे.

याचप्रमाणे डेंग्यु आजाराचे सुद्धा लवकर निदान करुन वेळेत उपचार करणे गरजेचे आहे. परंतु खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व रुग्णालये डेंग्यू व हिवतापाचे रुग्णासंबंधी माहिती शासकीय यंत्रणेला कळवत नाहीत,असे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

त्यामुळे भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दि. 9 जून, 2016 रोजी काढलेल्या अधिसुचनेनुसार डेंग्यू या आजाराला अधिसूचित (Notifiable) आजार म्हणून घोषित केले आहे. तसेच हिवताप हा आजार सुध्दा दि. 21 डिसेंबर, 2021 रोजी अधिसूचित (Notifiable) आजार म्हणून घोषित केलेला आहे.

डेंग्यु व हिवताप हे दोन्ही आजार अधिसूचित (Notifiable) म्हणून घोषित केले असल्याने आरोग्य सेवा देणाऱ्या प्रत्येक खाजगी रुग्णालयानी संशयित किंवा निदान झालेल्या डेंग्यु व हिवताप रुग्णांची माहिती संबंधितांना देणे बंधनकारक आहे, जेणेकरुन पुढील उपाययोजना करुन या आजाराचा प्रसार होणार नाही. त्यामुळे संबंधित संशयित रुग्णांची माहिती न दिल्यास सायरोग अधिनियम 1897 (1897 चा 3) कलम 2 नुसार संबंधितावर कार्यवाही होऊ शकते.

त्यामुळे सर्व खाजगी रुग्णालये, सुश्रुषालये, वैद्यकीय संस्था यांनी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा रुग्णालय यांना डेंग्यु व हिवताप रुग्णाविषयी त्वरित माहिती कळवावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे.

Related posts

नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी पापळकर

Santosh Awchar

ऐन दिवाळीत एसटी कडून भाडेवाढ! तिकीट दर वाढवून खाजगी वाहनाने जास्त भाडे आकारल्यास तक्रार करण्याचे केले आवाहन

Gajanan Jogdand

रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भुमरे हिंगोली दौऱ्यावर

Santosh Awchar

Leave a Comment