मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील नूतन उड्डाण पुलावरील डांबर सरकू लागले असून जागोजागी फट निर्माण झाली आहे. यामुळे सदरील उड्डाणपुलाचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे.
हिंगोली शहरातून जाणाऱ्या नांदेड राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कडून मागील तीन ते चार वर्षात रेल्वे उड्डाणपुलाचे काम करण्यात आले. एवढ्या धिम्या गतीने या उड्डाणपुलाचे काम झाले की सर्वसामान्यांना त्याचा त्रास सोसावा लागला.
2022 मध्ये या कामाला वेळ आला आणि दोन ते तीन महिन्यापूर्वी हा उड्डाणपूल रहदारीस खुला करण्यात आला. उड्डाणपूल निर्मितीत एवढा कालावधी गेल्याने उड्डाणपुलाचे काम चांगले झाले असेल अशी धारणा सर्वसामान्यांची झालेली आहे; मात्र सदरील उड्डाणपुलाचे काम बोगस झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
उड्डाणपुलावर झालेल्या डांबरीकरणाने जागा सोडली असून उड्डाण पुलावर अनेक ठिकाणी साईड डिव्हायडर आणि डांबरीकरणाच्या रोड मध्ये फटी निर्माण झाल्या आहेत.
अवघ्या काही दिवसातच उडान पुलावर हे चित्र दिसून येऊ लागल्याने काम कोणत्या दर्जाचे झाले हे सहज लक्षात येते. हा उड्डाणपूल म्हणजे निकृष्टतेचा उत्कृष्ट नमुना साकारल्याचे धारणा आता व्यक्त होऊ लागली आहे. या उड्डाणपुलावरील सुरक्षित वाहतुकीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागली आहे
उड्डाण पुलाच्या कामाची चौकशी करून संबंधित कंपनी यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.