मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / मनोज जयस्वाल :-
औंढा नागनाथ – तालुक्यातील नंदगाव ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक मागील पंधरा दिवसापासून फिरकले नाही. त्यामुळे गावातील कामे ठप्प झाली आहेत. विशेष म्हणजे गावचा पाणीपुरवठा देखील बंद असल्याने व ग्रामसेवक कोणताही प्रतिसाद देत नसल्याने अखेर ग्रामपंचायतच्या या ढिसाळ कारभाराला कंटाळून अखेर ग्रामस्थांनी 27 जुलै रोजी ग्रामपंचायतला कुलूप लावले आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या नंदगाव येथे मागील पंधरा दिवसापासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच बोरवेल, विहीर पाणी प्यावे लागत आहे. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्य धोक्यात येत आहे.
पाणीपुरवठा बंद का याचा शोध घेतला असता गावातील डीपीमध्ये बिघाड असल्याचे कारण समोर केले जात आहे.
गावातील डीपी दुरुस्त करण्यासह गावचा पाणीपुरवठा व इतर कामे करण्यासाठी मागील पंधरा दिवसापासून गावात ग्रामसेवक येत नाही. त्यामुळे गावातील ग्रामपंचायत निगडित कामे ठप्प झाली आहेत.
ग्रामसेवक प्रतिसाद देत नसल्याने व ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराला वैतागून अखेर गावातील ग्रामस्थांनी 27 जुलै रोजी सकाळी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले आहे.
गावातील पाणीपुरवठा व विद्युत डीपीसह इतर महत्त्वाची कामे मार्गी लागण्यासाठी औंढा नागनाथ गटविकास अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देत संबंधित ग्रामसेवकास आदेशित करावे, अशी मागणी देखील होऊ लागली आहे.