मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – देशी दारूची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या सेलसुरा येथील दोघांना हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. हे दोघेजण कारमधून देशी दारूची अवैधरित्या वाहतूक करत होते. त्यांच्या ताब्यातून 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यात लपून छपून चालणारे अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेतर्फे विशेष मोहीम राबवून कार्यवाही केली जात आहे.
28 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना उमरा फाटा ते सोडेगाव फाटा दरम्यान एक कार संशयितरित्या वेगाने जाताना दिसून आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर कारचा पाठलाग करून पकडली. सदर कारची तपासणी केली असता कारच्या डिक्की मध्ये देशी दारूचे दोन बॉक्स मिळून आले.
तसेच सदर कार मध्ये चालक नामे बद्रीनाथ लक्ष्मण घुगे व अजबराव राघोजी दराडे दोघे (रा. सेलसुरा) असे इसम मिळून आले. सदर व्यक्तींनी दारूची चोरटी वाहतूक करून चढ्या दराने विक्री करण्यासाठी नेत असल्याचे सांगितले.
पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दारू व कार असा येथून 3 लाख 9 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, तुषार ठाकरे सर्व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केली.