मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – यंदा हळदीने शेतकऱ्यांचे चांगलेच सोने करून दिले आहे. हळदीला सोन्याहून अधिक भाव मिळाला असून वसमत येथील बाजार समितीत हळदीने आत्तापर्यंतचे भाव मागे टाकत 30 हजाराचा आकडा गाठला आहे. तसेच हिंगोली येथील बाजार समितीत देखील हळदीला जवळपास 18 हजार रुपयांचा भाव आला.
वसमत येथील बाजार समिती शेषराव बोबने या शेतकऱ्याच्या हळदीला 4 ऑगस्ट रोजी सर्वाधिक 30 हजार रुपयांचा भाव मिळाला आहे.
तसेच अनेक शेतकऱ्यांच्या हळदीला 20 हजार 400 रुपयांचा भाव तर बहुतांश शेतकऱ्यांच्या हळदीला वीस हजार रुपयांवर भाव मिळाला आहे. हिंगोली येथील बाजार समितीत देखील हळदीचे भाव चढे राहिले.
हिंगोली येथील बाजार समितीत हळदीला 17 हजार 300 रुपयांपर्यंतचा भाव मिळाला एकूणच यंदा हळद उत्पादक शेतकऱ्यांचे हळदीने सोने करून दिले असून सोन्याहूनही जास्त भाव शेतकऱ्यांना मिळाला आहे.
वसमत येथील बाजार समितीत हळदीला 30 हजार रुपयांचा भाव मिळाला असला तरी बहुतांश शेतकऱ्यांकडे हळद विक्री झाली आहे. अंदाजे पाच टक्के शेतकऱ्यांकडेच हळद शिल्लक असून हळदीने 30 हजाराचा आकडा गाठला आहे.
हा भाव सुरुवातीस मिळाला असता तर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ मिळाला असता अशा प्रतिक्रिया आता हळद उत्पादक शेतकऱ्यांतून उमटत आहेत.