मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत देशातील 508 रेल्वे तर महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी करण्यात आली. यामध्ये हिंगोली डेक्कन रेल्वे स्थानकाचाही समावेश असून यासाठी 19.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे नागरिकांशी संवाद साधला.
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत सुमारे 19.50 कोटी रुपये खर्च करुन विकसित करण्यात येणाऱ्या रेल्वे स्थानकाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी हिंगोली येथील रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकास कामाचे कोनशिला अनावरण करण्यात आले. या
वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार तान्हाजी मुटकुळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार गजानन घुगे, माजी आमदार रामराव वडकुते, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, रामदास पाटील सुमठाणकर, फुलाजी शिंदे, के.के. शिंदे, गोवर्धन वीरकुंवर, गणेश साहू, उज्वला तांभाळे उपस्थित होते.
आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी हिंगोली हे शहर रेल्वेमुळे विविध राज्याला जोडला गेला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत हिंगोली रेल्वे स्टेशन पुनर्विकास होणार असल्यामुळे हिंगोली विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे हिंगोली रेल्वे स्थानकात विविध सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
माजी खासदार शिवाजीराव माने यांनी भारताची अंखडता कायम राखण्यासाठी रेल्वेने काम केले आहे. अमृत भारत स्टेशन योजनेत हिंगोलीचा पुनर्विकास होत असल्यामुळे हिंगोलीचा सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळणार असून हिंगोलीमध्ये रेल्वेचे एक वेगळे अस्तित्व निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री यांचे आभार मानले. यावेळी माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते, फुलाजी शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात रेल्वेचे स्टेशन मास्तर आर. एस. मिना अमृत भारत स्टेशन योजनेतून हिंगोली डेक्कन रेल्वे स्थानकात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख अब्दुल मस्तान यांनी केले. तर आभार रेल्वेचे अधिकारी पी. सुरेश यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते.
रेल्वे विभागातर्फे हिंगोली शहरातील विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाचे स्थानक म्हणून हिंगोली डेक्कन रेल्वे स्थानकाचा समावेश अमृत भारत स्टेशन योजनांतर्गत रेल्वे वापरकर्त्यांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी करण्यात आलेला आहे. गेल्या काही वर्षामध्ये स्थानकावर प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे आणि सध्या दररोज 3200 वापरकर्त्यासह सुमारे 32 ट्रेन हाताळत आहेत.
अमृत भारत स्टेशन योजनेचा एक भाग म्हणून विकसित होणारे हिंगोली डेक्कन हे स्टेशन अमृत भारत स्टेशन योजनेंतर्ग सुमारे 19.50 कोटी रुपये खर्च करुन विकसित केले जात आहे. हे काम पूर्ण झाल्यावर अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत अंमलता आणल्या जाणाऱ्या श्रेणी सुधारित योजनांच्या सौजन्याने हे स्टेशन क्लास आणि आरामात नवीन उच्च अनुभव घेण्यासाठी सज्ज होणार आहे.
हिंगोली रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासात करण्यात येणारी कामे :·
आधुनिक दर्शनी भागाचा विकास
परिभ्रमण क्षेत्रामध्ये सुधारणा
वाहतूक सुविधांचा मुक्त प्रवाह
वेटिंग हॉलमध्ये सुधारणा आणि प्रवासी अनुकूल संकेतांची तरतूद यासह दीर्घकालीन मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे.