मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – राज्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे व हा रोग जलदगतीने पसरणारा रोग असल्याचे दिसून आले आहे. या रोगाने हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत झाल्याचे दिसते. जिल्ह्यात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित विभागाला दिले.
हिंगोली जिल्ह्यात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.मधुसुदन रत्नपारखी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एस.बी. खुणे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गोजातीय प्रजातीची गुरे बाजाराच्या ठिकाणी खरेदी-विक्रीसाठी आणण्यात येणाऱ्या पशुधनास लंम्पी चर्मरोगासाठी लसीकरण व इनाफ (टॅगींग) करणे बंधनकारक करावे.
जनावरांचे बाजार भरविणारे कृषि उत्पन्न बाजार समिती, नगर परिषद, नगर पंचायत, ग्राम पंचायत किंवा इतर संस्थांनी याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी व त्याशिवाय खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यास सक्त मनाई करण्यात यावी, असे निर्देश दिले.
जिल्ह्यातील सर्व गोजातीय पशुधनास शंभर टक्के लम्पी चर्मरोगासाठी लसीकरण करण्यात यावे. जिल्ह्यातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात भटके, मोकाट पशुधन आढळून आल्यास पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने लसीकरण करणे व त्यांचे स्थलांतर नजीकच्या कोंडवाडा, गोशाळा, पशु आश्रय स्थान इत्यादी ठिकाणी करण्यात यावे.
प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 अन्वये जिल्हास्तरीय तसेच तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समितीने याबाबत स्थानिक स्तरावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात.
रोग प्रसार करणारे बाह्य किटक, परोपजीवी (गोचीड, गोमाशा, डास, माशा) यांच्या नियंत्रणासाठी जनावरांची व गोठ्याची किटक्नाशक औषधीने फवारणी करण्यात यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळर यांनी दिले आहेत.
लम्पी चर्मरोग नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण मोहिम राबवून शंभर टक्के लसीकरण पूर्ण करावेत. लम्पी रुग्णांचे लवकरात लवकर निदान करुन विलगीकरण करावे. लम्पी रुग्णांची जास्तीत जास्त काळजी घ्यावी. 20 टक्के औषधाचा वापर करावा. विद्यापीठाने व विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेद्वारे जनजागृती करावी.
बाधित क्षेत्रातील जनावराचे आठवडी बाजार गरजेनुसार बंद करावे किंवा लम्पी लसीकरणाच्या 28 दिवसानंतर जनावरांच्या वाहतुकीस परवानगी द्यावी.
रोग पसरवणाऱ्या बाह्य परोपजीवी डास, माशा, पिसवा, गोचीड, गोमाशा यांचे नियंत्रण करण्यासाठी माझा गोठा स्वच्छ गोठा मोहिमेअंतर्गत गोठे फवारणी कार्यक्रमात मोहिम स्वरुपात राबवावी. तसेच सर्व संस्थाप्रमुखांनी मुख्यालयी राहावेत, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी दिले आहे.