मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – जिल्हा पोलीस दलाकडून जिल्ह्यात जातीय सलोखा व शांतता संदेश देण्यासाठी 25 ऑगस्ट रोजी एकता दौड मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही दौड सकाळी सात वाजता पोलीस कवायत मैदान हिंगोली येथून सुरू होईल.
हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून हिंगोली जिल्ह्यात जातीय सलोखा अबाधित राहून शांतता नांदावी, सर्व नागरिकांनी सर्व जाती धर्माचा सन्मान व आदर करून कोणत्याही अफवेला बळी न पडता शांतता टिकवून ठेवण्यास पोलीस प्रशासनास सहकार्य करावे यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण हिंगोली पोलीस विभाग प्रयत्न करत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून पोलीस मुख्यालय येथे हिंगोलीतील सर्व प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत भव्य एकता दौड 5 कि.मी. धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरची दौड ही 25 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता संत नामदेव पोलीस कवायत मैदान हिंगोली येथून सुरू होऊन इंदिरा गांधी चौक- अग्रेसर चौक- जिल्हा परिषद समोरील नवीन रोड- जिल्हा परिषद कॉर्नर (पाण्याची टाकी)- शिवाजीनगर- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक- पोस्ट ऑफिस चौक- जवाहर रोड- महात्मा गांधी पुतळा चौक- इंदिरा गांधी पुतळा चौक अशी होऊन श्री संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे समारोप होईल.
जातीय सलोखा व शांततेचा संदेश देण्यासाठी हिंगोली जिल्हा पोलीस दलाकडून आयोजित करण्यात आलेल्या एकता दौड मध्ये जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले आहे.