मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथे 27 ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत स्थानिक शिवसैनिकांचे नियोजन विस्कटल्याचे दिसून आले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभास्थळी यायच्या 15 ते 20 मिनिटे आधी आयोजकांकडून नागरिकांसाठी एका ट्रकमध्ये खुर्च्या आणण्यात आल्या. या खुर्च्या मिळवण्यासाठी नागरिकांची नंतर मोठी गर्दी झाली. नागरिकांनाच ट्रक मधून खुर्च्या बसण्यासाठी न्याव्या लागल्या. यामध्ये सभेसाठी आलेल्या वृद्धांची मोठी गैरसोय झाली.
27 ऑगस्ट रोजी हिंगोली शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने हिंगोली येथील रामलीला मैदानावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा घेण्यात आली. उद्धव ठाकरे यांना पाहण्यासाठी रामलीला मैदान गच्च भरले होते. सभेदरम्यान अंदाजे दुपारी दीड ते दोन वाजेच्या मध्ये पाऊसही झाला.
झालेल्या पावसाने मैदान भिजले होते तर काही ठिकाणी चिखलही झाला. त्यामुळे मुख्य पेंडॉल वगळता सभेस्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येण्याआधी झालेल्या नेत्यांची भाषणे उभ्यानेच ऐकावी लागली.
सदरील बाब काहींच्या लक्षात आल्यानंतर उपस्थित नागरिकांसाठी खुर्च्या आणण्यात आल्या. खुर्च्यांचा ट्रक रामलीला मैदानावर आला. या ट्रक मधून काहींनी खुर्च्या काढण्यास मदत केली. मात्र नागरिकांना स्वतः बसण्यासाठी स्वतःच खुर्च्या न्यावे लागल्या खुर्च्या नेण्यासाठी अनेकांची पळापळ देखील झाली.
यामध्ये सभेत स्थळी उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आलेल्या वृद्धांची मोठी गैरसोय झाली. बहुतांश वृद्ध व्यक्तींना खुर्च्याच मिळाल्या नव्हत्या. त्यांच्यापर्यंत खुर्च्या पोहोचवण्यासाठी ठाकरे गटाचे स्थानिक शिवसैनिकही मदत करताना दिसून आले नाही.
तसेच उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना मुख्य पेंडाल मधील काही नागरिक उठूनही जात होते त्यांना थांबवण्यासाठी देखील ठाकरे गटाचे स्थानिक शिवसैनिक पुढे आले नाहीत, असे निदर्शनास आले.