Marmik
Hingoli live

कीड रोग नियंत्रण : अनुदानाचा लाभ घेण्यासाठी 30 सप्टेंबर पूर्वी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन              

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यात यंदा 3 लाख 28 हजार 968 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. यात 2 लाख 49 हजार 549 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा आहे. जिल्ह्यामध्ये आयोजित मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेटी दरम्यान सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रसार रोखण्यासाठी पिकाची वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.                

रोगाची लक्षणे : पानाच्या मुख्य शिरीपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात. त्यानंतर पाने जसे जसे परिपक्व होत जातात तसे तसे त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे पट्टे दिसतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात.

लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. प्रादुर्भावग्रस्त झाडांना फुले आणि शेंगा कमी लागतात. दाण्यांचा आकार लहान राहतो. शेंगा दाणे विरहीत राहून पोचट होतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोटी घट येते.                

उपाययोजना : सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा या विषाणूजन्य रोगाचा प्रसार मुख्यत: पांढरी माशी या रसशोषक किडीद्वारे केला जातो. याच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून त्यांना जाळून किंवा जमिनीत पुरुन नष्ट करावीत. पांढरी माशी आकर्षित करण्यासाठी पिवळे चिकट सापळे प्रती एकरी  10 याप्रमाणे लावावेत.               

आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास पांढरी माशी आणि पिवळ्या मोझॅक विषाणूचे एकात्मिक व्यवस्थापनासाठी खालीलपैकी कोणताही एका रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.               

थायमिथोक्झाम 12.6 टक्के+लॅम्बडा सिहॅलोथ्रीन 9.6 टक्के+ झेडसी या कीटकनाशकाची बाजारातील नावे अलिका, टॅगेटा, इरुका, अनोलिका, झपॅक ही असून प्रती 10 लिटर पाण्यात 2.5 मिली टाकून साध्या पंपाद्वारे प्रति एकर 50 मिली प्रमाणे फवारणी करावी.

असिटामिप्रीड 25 टक्के+बाइफेन्थ्रीन 25 टक्के+ डब्लयूजी या कीटकनाशकाची बाजारातील नावे स्पेरटो, अरजित ही असून प्रती 10 लिटर पाण्यात 5 ग्रॅम टाकून साध्या पंपाद्वारे प्रति एकर 100 ग्रॅम प्रमाणे फवारणी करावी.

बीटा साइफलुथ्रीन 8.49 टक्के+इमिडाक्लोप्रीड 19.81 टक्के+ओडी या कीटकनाशकाची बाजारातील नाव सोलोमन हे असून प्रती 10 लिटर पाण्यात 7 मिली टाकून साध्या पंपाद्वारे प्रति एकर 140 मिली प्रमाणे फवारणी करावी. पावर पंपासाठी किटनाशकाची मात्रा तीनपट वापरावी.               

त्यानुषंगाने नियंत्रणासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत पिकांसाठी सन 2023-24 या योजनेंतर्गत एकात्मिक कीड व्यवस्थापन या बाबीसाठी पिक संरक्षण औषधे/जैविक कीड नियंत्रण या निविष्ठांसाठी शेतकऱ्यांना किंमतीच्या 50 टक्के कमाल 500 रुपये प्रती हेक्टर याप्रमाणे कमाल 2 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देय आहे.               

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या व इतर कीड रोग नियंत्रणासाठी वरील निकषानुसार निविष्ठा खरेदी करुन त्याची खरेदी पावती, सातबारा, आधारकार्ड व बँक खात्यांचा तपशील इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाकडे दि. 30 सप्टेंबर, 2023 पूर्वी सादर करावेत.

त्यानुसार त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर पध्दतीने वर्ग करण्यात येईल. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

Related posts

Hingoli समगा येथील कयाधू नदीवरील पूल पाण्याखाली, दहा गावांचा संपर्क तुटला

Santosh Awchar

Hingoli अर्भकाच्या मृत्यू प्रकरणी दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

Santosh Awchar

हिंगोली जिल्ह्यात एकाच वेळी कोंबिंग ऑपरेशन! 41 ठिकाणी सराईत गुन्हेगारांची तपासणी, तिघांवर गुन्हे दाखल तर दोघांना अटक, जामीन पात्र 20 जणांना वॉरंट

Santosh Awchar

Leave a Comment