मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – अंतरवाली सराटी येथील मराठा समाज बांधवांच्या आंदोलनावर पोलिसांकडून झालेल्या लाठी चार्जचा हिंगोली जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. 1 सप्टेंबर रोजी सकल मराठा समाज बांधव सेनगावच्या वतीने सेनगाव येथे बंद पाळण्यात आला तर मराठा क्रांती मोर्चा कडून 4 सप्टेंबर रोजी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवल्याची माहिती मिळतेय.
महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा समाज बांधवांच्या वतीने राज्यभर शांततेत मोर्चे काढण्यात आले. मात्र अद्याप पर्यंत आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे.
याच मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे शांततेच्या मार्गाने कुपोषण सुरू असताना 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये मराठा समाजातील माता-भगिनी, लहान बालके, वयोवृद्ध नागरिक यांच्यासह शेकडो ग्रामस्थ गंभीर जखमी झाले.
या प्रकरणाचा मराठा समाज बांधव तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे. तसेच याबाबतचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.
या निवेदनात मराठा समाजाला तात्काळ ओबीसी संवर्गातून आरक्षण देण्यात यावे. घटनेची सखोल चौकशी करून जखमना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी.
जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना निलंबित करून त्यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी.
या घटनेची जबाबदारी स्वीकारून हा लाठीचार्ज करण्याचे आदेश देणाऱ्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
तसेच जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा हिंगोली च्या वतीने 4 सप्टेंबर रोजी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. या निवेदनावर एडवोकेट मनोज आखरे, अजित मगर, रमेश शिंदे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.