मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार, पांडुरंग कोटकर, मनोज जयस्वाल :-
हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथ – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाज बांधवांवर झालेल्या लाठीचार्ज च्या निषेधार्थ हिंगोली येथे मराठा क्रांती मोर्चा कडून जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
हिंगोली येथील सर्व शासकीय कार्यालय राष्ट्रीयकृत व काही खाजगी बँका, वाहतूक सुरू होती. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाज बांधवांकडून विविध मागण्यांसंदर्भात उपोषण सुरू होते. या उपोषणादरम्यान उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठी चार्ज केला.
यामध्ये अनेक मराठा समाज बांधव, माता भगिनी, वृद्ध जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा कडून 4 सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते.
सदरील बंदला सकाळपासून दुपारी 12 वाजेपर्यंत संमिश्र प्रतिसाद मिळाला हिंगोली येथे मुख्य बाजारपेठ तसेच औंढा नागनाथ, वाशिम, नांदेड महामार्गावरील मेडिकल दुकाने वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली होती; मात्र काही ठिकाणी हॉटेल्स, किराणा दुकान सुरू असल्याचे दिसून आले. तसेच रस्त्यावरून दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहने धावताना दिसून आली.
तसेच बहुतांश शासकीय कार्यालय राष्ट्रीयकृत बँकाही सुरू होत्या. काही खाजगी बँकाही सुरू होत्या. तसेच वाहतूकही सुरू असल्याचे दिसून आले. तसेच जिल्ह्यातील सेनगाव शंभर टक्के सुरू होते.
सेनगाव येथे या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाज बांधवांकडून शनिवार रोजीच बंद पाळण्यात आला होता. त्यामुळे 4 सप्टेंबर रोजी येथील बाजारपेठ 100% सुरू होती. तसेच तालुक्यात काही ठिकाणीच बंद पाळण्यात आला अशी माहिती मिळते.
श्री नागनाथ मंदिर सुरू
मराठा क्रांती मोर्चा कडून 4 सप्टेंबर रोजी जिल्हा बंद ची हाक देण्यात आली; मात्र श्रावण महिन्यातील आज तिसरा श्रावण सोमवार असल्याने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले औंढा नागनाथ येथील श्री नागनाथ महाराजांचे मंदिर भाविक भक्तांना दर्शनासाठी सुरू होते. तसेच जिल्ह्यातील बाराशिव मंदिर, सिद्धनाथ मंदिर आदी तीर्थक्षेत्र ही सुरू होते, अशी माहिती मिळतेय.