मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – तालुक्यात मागील वीस ते पंचवीस दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. पावसाने दीर्घकाळ उघडी दिल्याने खरीप हंगामातील मुख्य पीक असलेले सोयाबीन पाण्याअभावी जळू लागले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात यंदा उशिराने मोसमी पाऊस दाखल झाला. जून महिना जवळपास कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात शेवटच्या काही दिवसात जोरदार पाऊस झाला.
3 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सर्वदूर चांगलाच पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने अनेक भागात उघडीप दिली. दरम्यान, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील विविध पिकांची पेरणी केली.
यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, हळद, तुर, कापूस या पिकांचा समावेश आहे. झालेला जोरदार पाऊस या पिकांना चांगलाच मानवला काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने अनेक शेतात पाणी साचून पिके पाण्याखाली आली.
मात्र ऑगस्ट महिन्यात पहिला आठवडा वगळता पाऊस झाला नाही. 3 सप्टेंबर रोजी रात्री हिंगोली तालुक्यात तसेच जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला.
मात्र सेनगाव तालुक्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाचा थेंब पडला नाही. त्यामुळे तालुक्यातील मुख्य पीक असलेले सोयाबीन पाण्याअभावी जळून जाऊ लागले आहे. तसेच अनेक पिकांनी माना टाकल्या असून ही पिके वाळू लागली आहेत.
एकंदरीत तालुक्यातील खरीप हंगाम पाण्याअभावी धोक्यात आला असून शेतकरी मोठ्या चिंतेत व संकटात सापडला आहे. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस न झाल्यास खरीप हंगामातील मुख्य पीक असलेले सोयाबीन हे पूर्णतः जळून जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सदरील बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.