मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 27 ऑगस्ट रोजी हिंगोली येथे जाहीर सभा झाली. या सभेदरम्यान एका व्यक्तीची क्रुझर गाडी चोरणाऱ्या चोरट्यास हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्या ताब्यातून क्रुझर गाडी जप्त करण्यात आली आहे.
27 ऑगस्ट 2023 रोजी हिंगोली शहरात उद्धव ठाकरे यांची सभा होती. या सभेसाठी फिर्यादी शेख अजीम शेख रहीम (रा. ढाकणी ता. उमरखेड) हा त्याच्या मालकीची क्रुझर गाडी जिल्हा परिषद ग्राउंडच्या रोडने लावून सभेसाठी गेला होता. तेव्हा अज्ञात इसमाने फिर्यादीची क्रूजर गाडी चोरून नेली होती. यावरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सदर गुन्हा उघड करण्यासंदर्भाने स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांना सूचना देऊन पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने यांच्या नेतृत्वात पथक स्थापन केले होते.
पोलीस पथकाने घटनास्थळाला भेट देऊन बारकाईने पाहणी करून गोपनीय माहिती काढली असता गोपनीय सूत्रधाराद्वारे सदर क्रुझर गाडी ही आदिलाबाद राज्य तेलंगणा येथे वास्तव्यास असलेला आरोपी अविनाश पांडुरंग पखाले (वय 22 वर्षे रा. टेंभेश्वर नगर, झोपडपट्टी मस्जिद जवळ ढाणकी ता. उमरखेड ह. मु. केआरके कॉलनी वार्ड नं.7 आदिलाबाद राज्य तेलंगणा) यांनी चोरून नेली आहे व चोरलेली क्रुझर गाडी ही त्याच्याजवळ आहे, अशी माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने आदीलाबाद राज्य तेलंगाना येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन आरोपी नामे अविनाश पांडुरंग पखाले यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने सदर क्रुझर गाडी चोरी केल्याची कबुली दिली.
सदर आरोपीच्या ताब्यातून क्रुझर गाडी (अंदाजे किंमत एक लाख 50 हजार रुपये मुद्देमाल) जप्त करण्यात आला असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, पोलीस अंमलदार सुनील अंभोरे, नितीन गोरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले, तुषार ठाकरे यांनी केली.