मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील नूतन बस स्थानकात शौचालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे; मात्र सदरील शौचालयगृह हे कधीही कुलूप बंदच राहत असल्याचे निदर्शनास येत आहे.. त्यामुळे शौचालय गृह म्हणजे ‘नसून अडचण असून खोळंबा’ या म्हणी प्रमाणे ठरत आहे..
शासनाकडून लाखो रुपये खर्चून हिंगोली येथील नूतन बस स्थानकाचे बांधकाम करण्यात आलेले आहे; मात्र सदरील बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे यापूर्वीच सिद्ध झालेले आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने बस स्थानकातील पत्रे कोसळली होती.
तसेच पंखेही तुटून पडले होते. त्यानंतर आता बस स्थानकात नवीनच प्रकार उघडकीस येत आहे. बस स्थानकात अपंग व्यक्ती व पुरुषांसाठी बांधण्यात आलेले शौचालयगृह हे कधीही सकाळून कुलूप बंदच राहत असल्याचे निदर्शनास येत आहे.
सदरील प्रसाधनगृह हे कुलूप बंद राहत असल्याने प्रवाशांना बाटल्यांमध्ये पाणी घेऊन बस स्थानक परिसरात गवत, काटे – कुपाट्यांच्या आडोशाला उघड्यावर बसावे लागत आहे.
त्यामुळे बस स्थानक परिसर अस्वच्छतेचे आगार बनत असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटत आहे. त्यामुळे हिंगोली येथे शिक्षणासाठी येणारे खेडेगावातील विद्यार्थी, प्रवासी यांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले असून अपंग व्यक्तींची मोठी गैरसोय होत आहे.
सदरील बाबीकडे प्रशासनाने व हिंगोली बस स्थानक आगारप्रमुख यांनी लक्ष देऊन कुलूप बंद असल्याने प्रसाधनगृहे सुरू करावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.
आगाराला स्वच्छतेचा पडला विसर
हिंगोली जिल्हा भरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून पायाभूत सोयी सुविधांवर मोठा खर्च केला जात आहे. यामध्ये शौचालय, स्वच्छता, स्वच्छ पाणी, मजबूत घरे हे विषय प्राधान्याने घेतली जात आहेत. असे असले तरी हिंगोली येथील आगाराला स्वच्छतेचा विसर पडल्याचे दिसते. येथील जल केंद्रात प्लास्टिक पिशव्या आणि मळके कपडे पडल्याचे दिसून आले. सदरील बाब गंभीर असून प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने आगारास स्वच्छता पाळण्याबाबत ताकीद देणे गरजेचे आहे.