मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-
सेनगाव – येथे छतावरची साफसफाई करताना 33 के.वी. विद्युत तारेला लोखंडी पाईपचा स्पर्श झाल्याने एकाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सणासुदीच्या दिवसात या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
अशोक लीलाधर तोष्णीवाल (रा. सेनगाव) असे शॉक लागून मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अशोक तोष्णीवाल हे 9 ऑक्टोबर रोजी सकाळी स्वतःच्या मालकीच्या किराणा दुकानाच्या छतावरील भंगार जमा करत होते.
तसेच छतावरची साफसफाई करताना लोखंडी पाईप उचलून दुसरीकडे ठेवत असताना दुकानावरून गेलेल्या 33 के.वी. विद्युत तारेला लोखंडी पाईपचा स्पर्श झाल्याने विद्युत प्रवाह उतरला. यामध्ये शॉक लागून अशोक तोष्णीवाल यांचा मृत्यू झाला.
सध्या घटस्थापना आणि दसऱ्यानिमित्त सर्वत्र धामधुम सुरू आहे. यामध्ये अनेक कामे केली जातात. सणासुदीच्या तोंडावरच शॉक लागून अशोक तोष्णीवाल यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वृत्त लिहीपर्यंत पोलिसात कोणतीही फिर्याद देण्यात आली नव्हती.
शॉक लागल्याचा झाला मोठा आवाज
अशोक तोष्णीवाल हे लोखंडी पाईप उचलून दुसरीकडे ठेवताना त्यांच्या हातातील लोखंडी पाईपचा ३३ के. व्ही. स्पर्श झाला. यावेळी मोठा शॉक लागून आवाज झाल्यामुळे परिसरातील दुकानदार, नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व लगेचच अशोक तोष्णीवाल यांना ॲम्बुलन्स द्वारे हॉस्पिटलला घेऊन गेले; पण डॉक्टरांनी अशोक तोष्णीवाल यांना वृत्त घोषित केले.