मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे ग्रामीण भागात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना विजेअभावी पिकांना पाणी देता येत नाही. यामुळे आडगाव येथील शेतकऱ्यांनी आंदोलन केले असता महावितरणच्या ढिसाळ नियोजनावर पडदा टाकण्यासाठी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी आडगाव येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आवाज दाबण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. सदरील गुन्हे तात्काळ मागे घेऊन इतर मागण्या मंजूर करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती संजय भैया देशमुख यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दि. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हिंगोली तालुक्यातील आडगाव फाटा परिसरातील शेतकरी संवैधानिक मार्गाने महावितरणच्या ढिसाळ नियोजनाविरुद्ध आंदोलन करत होते.
राजकीय द्वेषापोटी हेतुपुरस्सर त्यांच्यावर महावितरण कंपनीने खोटे गुन्हे दाखल केले सदरील गुन्हे त्वरित मागे घेऊन शेतकऱ्यांच्या पुढील मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या – जळालेले रोहित्र शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावे.
जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय कार्यालयात जळालेले रोहित्र दुरुस्त करून त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे.
शेतकऱ्यांना दिवसा 8 तास विनाअडथळा वीज देण्यात यावी. शेतकऱ्यांनी भरलेला पीक विमा त्वरित मंजूर करावा.
शाळेचे खाजगीकरण करण्यात येऊ नये. पोलीस भरतीतील कंत्राटीकरण त्वरित थांबवावे.
विविध क्षेत्रात होणारी सरकारी भरती ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येऊ नये, अशा विविध अशा विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
सदरील मागण्या मान्य न झाल्यास 20 ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरावर मोठे जण आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर हिंगोली जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती माजी सभापती संजय भैय्या देशमुख यांची स्वाक्षरी आहे.