मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील बाजारात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झेंडूचे दर कमालीचे पडले आहेत. बेंगलोर, कोल्हार या भागात मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड झाल्याने तेथील शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडील झेंडू विक्रीसाठी हिंगोली येथील बाजारपेठेत आणला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक झेंडू उत्पादक शेतकरी पडत्या भावाने हवालदिल झाले आहेत.
15 ऑक्टोबर पासून हिंदूधर्मीयांचा नवरात्र उत्सव हा सण सुरू झाला आहे. आज देवीची पहिली माळ आहे. नवरात्र उत्सवा दरम्यान तसेच दसरा निमित्त झेंडू या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. झेंडूचे हे महत्त्व ओळखून अनेक शेतकरी झेंडूची लागवड करतात यातून दोन पैसे मिळतील ही रास्त अपेक्षा शेतकऱ्यांना असते.
मात्र यंदा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या झेंडूंना नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी 10 ते 12 रुपयांपर्यंतचा दर मिळाला आहे. जिल्ह्यातील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांकडून स्थानिक व्यापाऱ्यांनी जास्तीत जास्त 15 रुपयांपर्यंतचा दर देऊन त्यांच्याकडील झेंडू खरेदी केला आहे, असे समजते.
झेंडूचे दर खाली येण्यामागे बेंगलोर, कोल्हार या भागातील शेतकऱ्यांनी आपल्याकडील शेतकऱ्यांपेक्षा तीन पट जास्त उत्पादन झेंडूचे घेतले आहे. तेथील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील झेंडू थेट हिंगोलीच्या बाजारपेठेत आणण्यास सुरू केले आहे.
सदरील शेतकऱ्यांच्या झेंडू गुणात्मक दृष्ट्या चांगला असून तो आपल्याकडील झेंडूपेक्षा कैकपट चांगला आहे. या झेंडूच्या तुलनेत आपल्याकडील झेंडू कमी दर्जाचा भरत आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
तसेच बाहेरील राज्यातील झेंडू बाजारात उपलब्ध झाल्याने तसेच स्थानिक झेंडूला दर नसल्याने अनेक व्यापाऱ्यांनी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून झेंडू खरेदी करणे थांबवले आहे, असे समजते. आज नवरात्र उत्सवातील दुर्गा मातेची पहिली माळ आहे. या माळेसाठी झेंडूचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.
नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या झेंडूंना 10 ते 12 रुपयाचा दर मिळाल्याने हे शेतकरी हवालदिल झाले आहेत. येणाऱ्या काही दिवसात झेंडूचे दर आणखी खाली जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.
…म्हणून आम्ही खरेदी थांबवली
हिंगोली जिल्ह्यातील बाजारपेठेत बेंगलोर, काल्होर या भागातील शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील झेंडू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला आहे. सदरील झेंडू चा दर्जा जिल्ह्यातील झेंडू पेक्षा चांगला आहे. झेंडू बाजारात आणल्यानंतर काही तासात विक्री होणे गरजेचे असते. तसे नाही झाल्यास गाडी भाडे मिळणे ही अशक्य होते. आपल्याकडील शेतकऱ्यांचा झेंडू बाहेरील राज्यातील झेंडूच्या दर्जापेक्षा कमी भरतो. त्यामुळे नागरिक हा झेंडू खरेदी करत नाहीत तसेच केला तर भाव पाडून मागतात. त्यामुळे आम्ही स्थानिक शेतकऱ्यांकडून झेंडू खरेदी करणे थांबवले आहे. सध्या झेंडूला भाव नसून येत्या काही दिवसात झेंडूचे दर आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. झेंडूला बाजारपेठ मोठे आहे. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील बाजारपेठेवर अवलंबून न राहता त्यांनी आपल्याकडील झेंडू पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक अशा मोठ्या बाजारपेठेत विक्रीसाठी न्यावा, असे सेनगाव येथील झेंडूचे व्यापारी शेख कलीम शेख गफूर यांनी ‘मार्मिक महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.