मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पशुधन चोरणारी आंतरजिल्हा टोळी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून जेरबंद केले आहे. यावेळी जनावरे चोरीचे चार गुन्हे उघड झाले असून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून 5 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सेनगाव पोलीस ठाणे तसेच नरसी नामदेव पोलीस ठाणे हद्दीतील शेतकऱ्यांचे पशुधन चोरीच्या घटना घडल्या होत्या. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यांना फिर्यादी शेतकरी यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपील विरुद्ध कलम 379 भादवी अन्वय गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सदरचे गुन्हे उघड करून गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश देऊन मार्गदर्शन केले होते.
पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू आणि त्यांचे तपास पथकाने नमूद घटनास्थळी व परिसरात भेटी देऊन तंत्रशुद्ध तपास पद्धती व गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने माहिती घेतली.
सदरचे गुन्हे राजू देवराव गव्हाणे (वय 22 वर्ष), नामदेव देवराव गजभार (वय 32 वर्ष), शेषराव धर्मा वंजारे (वय 40 वर्ष), रामेश्वर सिताराम महाजन सर्व (रा. कळमेश्वर ता. मालेगाव जि. वाशिम) यांनी केले व चोरून नेले याबाबत तपास पथकास माहिती मिळाली.
यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद आरोपींच्या गावी जाऊन आरोपी राजू गव्हाणे, नामदेव गजभार व शेषराव वंजारे यांना सीताफिने ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी वर नमूद पोलीस ठाणे परिसरात व नरसी नामदेव तसेच कळमनुरी पोलीस ठाणे अंतर्गत 2 जनावरे चोरी असे एकूण चार जनावरे चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून बोलण्यात चोरून नेलेले पशुधन जनावरे विक्री करून प्राप्त केलेली नगदी 83 हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली चार चाकी वाहन टेम्पो पाच लाख रुपये, असा एकूण 5 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नमूद आरोपींविरुद्ध वाशिम जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात जनावरे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींना पुढील तपासासाठी सेनगाव पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कार्यवाही हिंगोली चे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, लिंबाजी वावळे, विठ्ठल काळे, महादू शिंदे, ज्ञानेश्वर पायघन, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे, दीपक पाटील, दत्ता नागरे यांनी केली.