मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील पंचायत समिती कार्यालयात सध्या कोऱ्या कागदांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. येथे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना अर्ज लिहिण्यासाठीही कागद उपलब्ध नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहेत. या गंभीर बाबीकडे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेने लक्ष देण्याची गरज आहे.
हिंगोली येथील पंचायत समिती कार्यालयात तालुक्यातील ग्रामस्थ व हिंगोली शहरातील नागरिक आपल्या कामानिमित्त येत असतात सिंचन विहीर, हातपंप, घरकुल, गोठा आदी योजनांचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील ग्रामस्थ येथे येत असतात. यातील काहींच्या प्रस्तावात अर्ज नसतो तर काहींचे प्रस्ताव अपूर्ण असतात. यातील काहींच्या प्रस्तावात संपूर्ण बाबींची पूर्तता केलेली असते.
मात्र अर्जच नसतो तर काही ग्रामस्थांना नव्याने अर्ज द्यावे लागतात. यासाठी कागदांची आवश्यकता असते. अर्जदारांनी येथील आवक – जावक विभागातील कर्मचाऱ्यांकडे कागदांची मागणी केली असता हे कर्मचारी ग्रामस्थांवर खेकसून पडत आहेत.
ग्रामस्थ आणि नागरिकांना कागदच नसल्याचे या कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिक व ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या संपूर्ण गंभीर बाबीकडे पंचायत समिती गट विकास अधिकारी व जिल्हा परिषदेने लक्ष देण्याची गरज आहे.
कामानिमित्त येणाऱ्या ग्रामस्थ व नागरिकांना येथील कर्मचारी कोरा कागद तर देत नाहीतच पण खेकसून पडत आहेत. या कर्मचाऱ्यांना व्यसन घालण्याची मागणी ही नागरिकांतून केली जात आहे.
गटविकास अधिकाऱ्यांनी हात टेकले!
हिंगोली जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी (ग्रामसेवक) यांचे मागील कित्येक दिवसांपासून त्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी असहकार आंदोलन सुरू आहे. हे अधिकारी त्यांच्या कार्याचा अहवाल पंचायत समिती कार्यालयास सादर करत नसून मागील काही दिवसांपासून आढावा बैठकही घेण्यात आलेली नाही. तसेच सदरील अधिकारी हे हिंगोली गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत नसल्याचे गटविकास अधिकारी बोथीकर यांनी ‘मार्मिक महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले. या अधिकाऱ्यांच्या अशा वागण्याने गटविकास अधिकाऱ्यांनी हात टेकले आहेत. ग्रामविकास अधिकारी यांच्या मागण्यांकडे जिल्हा परिषदेने दुर्लक्ष केले असून त्यावर कोणताच तोडगा न निघाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. जिल्हा परिषदेने याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.