मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील जिल्हा परिषदेच्या अभ्यागत कक्षात अचानक आग लागली. अवघ्या काही सेकंदात येथून आगीचे डोंब निघू लागले. सदरील बाब जिल्हा परिषद प्रशासनाच्या तात्काळ लक्षात येताच प्रशासनाच्या सतर्कतेने व हिंगोली नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या कार्यतत्परतेने ही आग अवघ्या दहा मिनिटात आटोक्यात आली.
22 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या अभ्यागत कक्षात अचानक आग लागली या कक्षात वाचण्यासाठी मासिके, त्रैमासिके व शासकीय योजनांची माहिती देणारे पुस्तके असतात.
आगीत सदरील पुस्तके भक्षस्थानी पडली असावीत असा अंदाज येतोय. अचानक लागलेल्या या आगीने काही सेकंदात विक्राळ रूप धारण केले. सदरील बाब जिल्हा परिषद प्रशासनाच्या तात्काळ लक्षात येताच जिल्हा परिषद प्रशासनाने अधिकारी कर्मचाऱ्यांना बाहेर काढले.
तसेच आगीची तात्काळ माहिती हिंगोली नगर परिषदेच्या अग्निशमन दलास दिली. अवघ्या काही मिनिटात अग्निशमन दल घटनास्थळी आले. अग्निशमन दलाने अवघ्या दहा मिनिटात सदरील आग आटोक्यात आणली. या कामी जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनीही मोठी मदत केली.
सदरील आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. ज्या कक्षात ही आग लागली त्या अभ्यागत कक्षाच्या बाजूलाच सामान्य प्रशासन विभाग आणि इतर महत्त्वाचे विभाग आहेत.
आगीत किती नुकसान झाले याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. मात्र संबंधित विभागांना त्यांचे दस्तऐवज सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत प्रशासनाकडून तोंडी सूचना दिल्या जात होत्या.
आगीचे डोंब 10 मिनिटात आटोक्यात!
जिल्हा परिषदेच्या अभ्यासत कक्षात अचानक लागलेल्या आगीचे आगडोंब निघू लागले होते. जिल्हा परिषद प्रशासनाच्या सतर्कतेने व हिंगोली नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या कार्यतत्परतेने सदरील आगीचे डोंब अवघ्या 10 मिनिटात आटोक्यात आले, अशी माहिती जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंतकुमार कुंभार यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या मागे दुर्घटनांचे शुक्लकाष्ट!
ऑगस्ट महिन्यात भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर जिल्हा परिषद इमारतीच्या आवारातच गोळीबार झाला होता. यामुळे जिल्हा परिषदेच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या घटनेनंतर अवघ्या तीन महिन्याच्या अंतरावर 22 नोव्हेंबर रोजी शॉर्टसर्किटने आगीची घटना घडली आहे. यामुळे राज्यात पुन्हा जिल्हा परिषद चर्चेचा विषय ठरू लागली आहे.