मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील स्थानिक गुन्हे शाखेने मोटार सायकल चोरणारी आंतरजिल्हा टोळी पकडून जेरबंद केली आहे. या टोळीकडून 10 मोटार सायकलसह 7 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालून आरोपींना पकडण्याच्या सूचना हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना दिल्या होत्या.
या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याबाबत माहिती घेत होते.
2 डिसेंबर रोजी वसमत शहरात पेट्रोलिंग दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की आरोपी नामे जसविंदरसिंग रकबिंदर सिंग चव्हाण (वय 18 वर्षे, रा. नवा मोंढा, रेल्वे स्टेशन रोड, वसमत), सतवनसिंग सुभाषसिंग चव्हाण (वय 32 वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. रेल्वे स्टेशन रोड वसमत), सचिन मधुकर भोसले (वय 45 वर्षे व्यवसाय
मजुरी रा. टेंभुर्णी तालुका वसमत जिल्हा हिंगोली), भूपेंदरसिंग मोहनसिंग (वय 20 वर्ष रा. देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा), सुरज (रा. गुंज तालुका वसमत) यांनी व त्यांच्या इतर साथीदारांनी मिळून हिंगोली, नांदेड ,छत्रपती संभाजी नगर, परभणी, अशा विविध जिल्ह्यातून मोटारसायकलीची चोरी केली आहे.
चोरीच्या मोटरसायकल आरोपींच्या घरी ठेवल्या आहेत, अशी माहिती मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने रेल्वे स्टेशन परिसर वसमत येथे आरोपींच्या घरी छापा मारला असता तेथे वेगवेगळ्या कंपनीच्या 10 चोरीच्या मोटार सायकल मिळून आल्या.
त्यापैकी वसमत शहर पोलीस ठाण्यात एक मोटर सायकल, कुरुंदा पोलीस ठाणे हद्दीतून एक मोटर सायकल, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलीस ठाणे, वजीराबाद पोलीस ठाणे हद्दीतून प्रत्येकी एक, मोटरसायकल छत्रपती संभाजीनगर येथील जीनसी पोलीस ठाणे हद्दीतून एक, मोठा सायकल परभणी जिल्ह्यातील मानवत पोलीस ठाणे हद्दीतून एक मोटार सायकल चोरल्याचे निष्पन्न झाले.
सदर आरोपींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. आरोपीस वसमत शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.
ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, विठ्ठल कोळेकर, गणेश लेकुळे, आकाश टापरे, अजित सोर, चापोशी तुषार ठाकरे यांनी केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईचे सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.