मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – जिल्ह्यावर सकाळपासून ढगाळ वातावरण राहिले. परिणामी जिल्ह्याचे तापमान कमालीचे खाली गेले आहे. दुपारी 2 ते 3 वाजे दरम्यानचे तापमान 24°c एवढे होते तर सायंकाळी 6 वाजेचे तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे होते. त्यामुळे आधीच गारठा जाणवू लागला असतानाच त्यात शितलहरींची भर पडली. त्यामुळे बोचऱ्या शीतलहरींनी हिंगोलीकर पार गारठून गेले. सायंकाळी अंदाजे सव्वा सहा वाजेपासून पावसाची भुरभुर होती.
हिंगोली जिल्ह्यावर 5 डिसेंबर रोजी दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यात मागील काही दिवसात अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे संपूर्ण रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता आहे. 6 डिसेंबर रोजी सकाळपासून जिल्ह्यावर ढगाळ वातावरण राहिले.
या वातावरणाने हिंगोली करांना 8 वाजेपासून सूर्यदर्शन झाले नाही. या बदलत्या वातावरणामध्ये थंडीही जाणवू लागली. त्यातच 30 किलोमीटर प्रति तास याप्रमाणे थंड हवा सुटू लागली आहे.
बुधवार रोजी दुपारी 2 ते 3 वाजे दरम्यान हिंगोली शहरासह जिल्ह्यातील विविध भागाचे तापमान 24°c एवढे नोंदविले गेले तर सायंकाळी 6 वाजे दरम्यानचे तापमान 21 अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. रात्रीचे तापमान 14 अंश सेल्सिअस पेक्षाही खाली जाण्याची शक्यता आहे.
या थंडीत शीतलहरी जाणवू लागल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी स्वतःसह घरातील अबाल – वृद्धांची काळजी घ्यावी असे आवाहन मार्मिक महाराष्ट्र समूहाच्या वतीने करण्यात येत आहे.