मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – हिंगोली लोकसभा मतदार संघात मागील आठवडाभरापासून आवकाळी पाऊस सुरुच आहे. अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या ऊस, केळी, कापूस अशा नगदी पिकांसह सोयाबीन, तूर, ज्वारी व पालेभाज्यांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना १८० कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे.
खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिंगोली शहरासह, वसमत, औंढा, सेनगाव, कळमनुरी, हिमायतनगर, किनवट, माहूर, हदगाव यासह उमरखेड आणि महागाव विधानसभा क्षेत्रातील ११ तालुक्यातील हजारो हेक्टर शेतपिकांची पावसाच्या पाण्याने नासाडी झाली असल्याची सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून १८० कोटी रुपये लवकरच त्यांच्या खात्यात वर्ग केले जातील असे कळविले आहे.
हिवाळा असताना हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरु आहे. या गारपीटीचा रब्बी पिकांना फटका बसला आहे.
यंदा कमी पावसामुळे खरीप हंगाम चांगला आला नाही. यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिके चांगली आल्याने त्यातून दोन पैसे हाती लागतील अशी अपेक्षा होती. परंतु अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. सर्व रब्बी पिके झोपली आहे.
सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना वेळेवर नुकसान भरपाई देऊन त्यांना राज्य सरकारने धीर आणि दिलासा द्यावा अशी मागणी देखील खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
—
आपला,
शिवचरण वावळे
(जनसंपर्क अधिकारी)
मो. 9960988457
मा. खासदार हेमंतभाऊ पाटील संपर्क कार्यालय, नांदेड