मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेतकऱ्यांच्या शेतातील मोटार पंप चोरी करणारी टोळी पकडून जेरबंद केले आहे. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेतले असून 12 गुन्हे उघड केले आहेत. तसेच आरोपींच्या ताब्यातून मोटार पंप, नगदी रुपये व मोटार सायकल असा एकूण 1 लाख 84 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हट्टा पोलीस ठाणे हद्दीत असोला शेत शिवारात व परिसरात मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या शेतातील तसेच कॅनॉलमधील मोटार पंप चोरीचे गुन्हे घडले होते.
याबाबत संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून हट्टा पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपींविरुद्ध 6 चोरीचे गुन्हे दाखल असून त्याचप्रमाणे सेनगाव पोलीस ठाणे, बासंबा, कुरुंदा, वसमत शहर व वसमत ग्रामीण परिसरातही शेतातील व परिसरातील मोटार पंप व स्टटर चोरीचे गुन्हे घडले होते. संबंधित पोलीस ठाण्यातही कलम 379 भादवी अन्वये गुन्हे दाखल आहेत.
सदरचे मोटार पंप चोरीचे गुन्हे उघड करून सदर गुन्हे करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश देऊन मार्गदर्शन केले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू व त्यांच्या तपास पथकाने नमूद घटनास्थळी व परिसरात भेटी देऊन तंत्रशुद्ध तपास पद्धती व गोपनीय बातमीदार यांच्या मदतीने माहिती घेत सदरचे गुन्हे देवबा पांडुरंग घुगे व अभिजीत संतोष बांगर दोन्ही रा. असोला ता. औंढा नागनाथ यांनी मिळून केल्याबाबत तपास पथकाला माहिती मिळाली.
यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद आरोपींना सापळा रचून सीताफिने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांनी 12 गुन्ह्यांची कबुली दिली.
आरोपींकडून तपासात वरील प्रमाणे जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यामधील मोटार पंप व इतर साहित्य चोरीचे 12 गुन्हे उघड करण्यात आले असून तपासात त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरून नेलेले मोटार पंप एकूण पाच किंमत 50 हजार रुपये, गुन्ह्यातील चोरून नेलेले मोटार पंप तोडून विक्री करून मिळविलेले नगदी ५४ हजार ५०० रुपये व गुन्ह्यात वापरलेले पल्सर मोटरसायकल किंमत 80 हजार रुपये असा एकूण 1 लाख 84 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, शेख बाबर, विठ्ठल काळे गणेश लेकुळे, विठ्ठल कोळेकर, ज्ञानेश्वर सावळे, तुषार ठाकरे, इरफान पठाण, दीपक पाटील, दत्ता नागरे यांनी केली.