मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शहरालगत असलेल्या ससेवाडी येथे राहणाऱ्या खोक्यात आंतर जिल्हा खिसेकापू (पाकीट मारा) स एमपीडीए कायद्या अंतर्गत एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पाठविलेल्या प्रस्तावानुसार हिंगोली जिल्हाधिकारी यांनी कार्यवाहीचे आदेश काढले आहेत.
हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व सतत गुन्हे करणाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाहीची भूमिका घेऊन अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची इत्यंभूत माहिती काढून ते करत असलेल्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा, फौजदारी प्रक्रिया संहिता व एमपीडीए कायद्याअंतर्गत प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे.
यानुसार धोकादायक व्यक्ती नामे सय्यद जुनेद सय्यद अब्दुल कबीर (वय 21 वर्ष व्यवसाय मजुरी रा. गोरेगाव ता. जि. हिंगोली हंगामी मुक्काम ससेवाडी ता.जी. हिंगोली) याच्यावर मागील अनेक वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली शहर पोलीस ठाणे हिंगोली ग्रामीण हट्टा पोलीस ठाणे हद्दीत शरीराविरुद्धच्या व मालाविरुद्धचे एकूण 8 गुन्हे दाखल होते. तसेच प्रतिबंधात्मक कार्यवाही सुद्धा करण्यात आली होती; मात्र तो सतत गुन्हे करत होता.
त्यामुळे तो समाजासाठी धोकादायक बनला होता. त्याच्या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. तसेच सामाजिक स्वास्थ्य व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहोचविणारा धोकादायक व्यक्ती बनला होता.
म्हणून पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने सदर प्रकरण हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. आमले व हिंगोली ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्फतीने नमूद व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोक्कादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडिओ पायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबतचा अधिनियम 1981 (एमपीडीए) चे कलम 3 (1) अन्वय कार्यवाहीचा प्रस्ताव हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे सादर केला होता.
पोलीस अधीक्षक यांनी सदर प्रस्ताव हिंगोली जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता.
जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सदर प्रकरणाची सविस्तर पडताळणी करून नमूद धोकादायक व्यक्ती नामे सय्यद जुनेद सय्यद अब्दुल कदीर (वय 21 वर्षे, व्यवसाय मजुरी रा. गोरेगाव ता.जी. हिंगोली हं. मु. ससेवाडी ता.जी. हिंगोली) हा सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरवून धोकादायक व्यक्ती बनल्याने त्यास एमपीडीए 1981 (सुधारणा 1996, 2009 आणि 2015) कलम 3 (2) अन्वये एका वर्षासाठी कारागृहात स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले आहे.
नमूद स्थानबद्ध व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असून त्यास परभणी मध्यवर्ती कारागृह येथे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर प्रस्ताव तयार करण्यामध्ये हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील प्रतिबंधक कार्यवाही पथक, स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली तसेच हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. आम्ले, पोलीस उपनिरीक्षक मुपडे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.