Marmik
हिंगोली कानोसा

हिंगोली लोकसभा : महायुतीतील तीनही पक्षांकडून जोरदार हालचाली

गमा

केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप पक्षाची विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त केंद्र व राज्यातील मंत्र्यांचे हिंगोली दौरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिव संकल्प जाहीर सभा तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हिंगोली जिल्ह्याला जास्तीत जास्त वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे आश्वासन या सर्वांवरून भाजप या पक्षासह शिवसेना (शिंदे) गट व राष्ट्रवादी (अजित पवार) गट सक्रिय झाल्याचे दिसते… 14 जानेवारी महायुतीची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीकडे ही सर्वांचे लक्ष लागले आहे..

सध्याच्या लोकसभेची मुद्दत दीड ते दोन महिने एवढी शिल्लक राहिलेली आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू होईल. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाकडून मागील काही दिवसांपासून विकसित भारत संकल्प यात्रा राबविली जात आहे..

या यात्रेनिमित्त केंद्र व राज्यातील विविध विषयांच्या मंत्र्यांचे दौरे राज्याच्या विविध भागात आखले जात आहेत.. हिंगोली जिल्ह्यात दर दिवशी दहा गावांमध्ये ही विकसित भारत संकल्प यात्रा जात आहे. यात्रेत भाजपाच्या स्थानिक पुढार्‍यांची उपस्थिती लाभत आहे.

मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात एकदाही आपल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावीशी वाटू न शकणाऱ्या भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ केंद्र सरकारला निवडणुकीच्या ऐन तोंडावर जनतेसमोर योजनांची जंत्री यायात्रातून उघडावीशी वाटली हे विशेष! तसेच सदरील यात्रांसाठी केंद्रातील मंत्र्यांची बुडे हलली हेही विशेष आणि जनतेस या विषयाचे मंत्री असल्याचे समजले या मंत्र्यांच्या आदरातिथ्यसाठी पुढे शासकीय यंत्रणा राबविण्यात आली, राबविली जात आहे..

हिंगोलीत अलीकडेच केंद्रातील मंत्र्यांनी दोन दिवसाचा दौरा केला चार-पाच गावे करून व नंतर पक्षाची बैठक घेऊन हे मंत्री परतले सध्या हिंगोली लोकसभेसाठी प्रबळ दावेदार म्हणून रामदास पाटील सुमठाणकर या सनदी अधिकाऱ्याचे नाव अग्रभागी आहे.

रामदास पाटील हे हिंगोली लोकसभेची तयारी करत असून आत्तापर्यंत बहुतांश विकसित भारत संकल्प यात्राना ते उपस्थित राहिले आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री वॉर रूम महासंचालक पदाचा राजीनामा देणारे व आम आदमी पक्षाकडून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले राधेश्याम मोपलवार हेही राजकारणात उतरत आहेत. त्यांचा मनसुबाही हिंगोली लोकसभा निवडणूक लढविण्याचा असून राजीनामा दिल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले. मोपलवार यांना हिंगोली लोकसभेसाठी उमेदवार म्हणून निवडल्यास विजयोत्सव साजरा करण्यास निघालेल्या रामदास पाटील सुमठाणकर यांच्यासह भाजपातील इच्छुक उमेदवारांच्या राजकीय आशा, आकांक्षांवर पाणी फिरले जाऊ शकते..

सध्या हिंगोली लोकसभेवर सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे हेमंत पाटील खासदार आहेत ते दुसऱ्यांदा हिंगोली लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे दिसते..

शिवसेना (शिंदे) गटासाठी हिंगोली लोकसभेची जागा सुटल्यास उभे राहिलेल्या उमेदवारास मते मिळावीत म्हणून तसेच पक्ष वाढविण्यासंदर्भात 10 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आखाडा बाळापूर येथे शिवसंकल्प जाहीर सभा पार पडली. या सभेस जिल्हाप्रमुख तथा कळमनुरीचे आमदार संतोष (दादा) बांगर यांच्यासह हेवे – दावे विसरून पालक मंत्री अब्दुल सत्तार व खासदार हेमंत पाटील उपस्थित होते.

हिंगोली लोकसभेची जागा महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्या पैकी कोणा एकास सुटेल अशी आशा असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्याच दालनातून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय प्रारूप आराखडा बैठकीचे आयोजन करून हिंगोलीची आकांक्षीत जिल्हा ही ओळख पुसण्यासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देऊ असे आश्वासन दिले.

मात्र असे असले तरी त्यांच्या गटाचे हिंगोली जिल्ह्यात कोणताही उमेदवार दिसत नव्हता. अशात वसमतचे आमदार राजू नवघरे यांचे नाव अजित पवार गटात आले. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून हिंगोली लोकसभेसाठी त्यांचे नाव चर्चेत येऊ लागले आहे..

त्यामुळे आता महायुतीतील भाजपसह शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी दावे ठोकले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महायुतीतील कोणत्या पक्षाकडे हिंगोलीची जागा जाते आणि कोण उमेदवार उभे राहतो याकडे जिल्हा वाशियांचे लक्ष लागले आहे. दरम्य

महायुतीची लोकसभेच्या निवडणुकी संदर्भाने हालचाली सुरू असतानाच इंडिया आघाडीतील पक्षांकडून अद्याप या जागेसाठी कोणत्याही उमेदवाराचा चेहरा पुढे करण्यात आलेला नाही इंडिया आघाडीतील कोणत्या पक्षास हिंगोली लोकसभेची जागा जाते आणि कोण उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहतो याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे…

( शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरीचे विद्यमान आमदार संतोष (दादा) बांगर यांनी 14 जानेवारी रोजी महायुतीची समन्वय बैठक आयोजित केली आहे. मधुर दीप पॅलेस येथे सदरील बैठक पार पडणार असून बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.)

Related posts

हिंगोली, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर लोकसभा जागा वाटपाचा आज रात्री लागणार निकाल

Gajanan Jogdand

महायुतीत फूट? रामदास पाटलांनीही भरला उमेदवारी अर्ज!

Gajanan Jogdand

हिंगोली लोकसभा: भाजपचा उमेदवार कोण?

Gajanan Jogdand

Leave a Comment