गणेश पिटेकर
लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. सर्वसामान्य मतदार हा धर्मात अडकलेला आहे हे जाणून राजकारणी धार्मिक कार्यक्रम घेण्यात दंग आहेत. धार्मिक कार्यक्रमात मार्गदर्शन करणारे कथाकथित बाबा, महाराज हे समाजाप्रति किती उत्तरदायी असतात? याचे उत्तर शून्य असे आहे. यांना त्यांचे मठ, आर्थिक फायदा यातच हितसंबंध असतात. जनतेने त्यांचे दैनंदिन प्रश्न विसरून राजकारण्यांना मोकळे रान उपलब्ध करून द्यावे हाच त्या मागील उद्देश असू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही…
निवडणुकींचा काळ सुरू झाला आहे. मुद्द्यांवर बोलण्याऐवजी आता भावनिक मुद्दे पुढे करून लोकांना मूलभूत प्रश्नापासून दूर नेले जाताना दिसेल. शहरा-शहरात धार्मिक कार्यक्रम ठेवून त्यांना गुंतवले जाणार आहे. आणि तसे होताना अवती – भवती दिसत आहे.नागरिकही राजकारण्यांच्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. ती अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे वास्तवाचे भान हरवून बसली आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये तुमच्या नगरसेवक, आमदार आणि खासदाराने विकासात्मक कामे किती केली? तुमच्या परिसरातील, भागातील प्रश्न महानगरपालिका, विधिमंडळ आणि संसदेत किती मांडली आहेत? एकदाची निवडणूक झाली की ही मंडळी किती वेळा तुम्हाला तुमचे प्रश्न जाणून घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसले? रोजगार, शिक्षण, आरोग्यासह इतर प्रश्न तुमच्यासाठी आणि मुलांसाठी महत्त्वाचे नाहीत का?
इतके वर्षे होऊनही साधा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही राजकारण्यांकडून सुटलेला नाही. मग आपण मतदार म्हणून इतके राजकारण्यांना हलक्यात घेणे कितपत योग्य ठरेल? धर्माचे आणि जातीचे कार्ड वापरून निवडून येणाऱ्या पुढाऱ्यांना आपण किती दिवस संरक्षण देणार आहोत. मतदार म्हणून आपण यांना आपली ताकद दाखवणार आहोत की नाही. बिचारे मतदार म्हणून आपण आपली भूमिका निभावणार आहोत का? सध्या राजकारणी धार्मिक कार्यक्रम घेण्यात दंग आहेत.
धार्मिक कार्यक्रमात मार्गदर्शन करणारे कथाकथित बाबा, महाराज हे समाजाप्रति किती उत्तरदायी असतात? याचे उत्तर शून्य असे आहे. यांना त्यांचे मठ, आर्थिक फायदा यातच हितसंबंध असतात. जनतेने त्यांची दैनंदिन प्रश्न विसरून राजकारण्यांना मोकळे रान उपलब्ध करून द्यावे हाच त्या मागील उद्देश असू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिक म्हणून आपण जागरूक असणे गरजेचे आहे. नाहीतर त्याचे दुष्परिणाम आपण भोगत आहोतच. पण आपण उद्देशापासून दूर जाऊ….