मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – हमाल – माथाडी कामगारांना यापुढे केलेल्या कामाची वाराई मागता येणार नाही. या कामास प्रतिबंध करणारे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे राज्याच्या पणन संचालकाचा छत्रपती संभाजी नगर येथील जाधव वाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल येथे मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
हमाल कष्टकरी व माथाडी कामगारांना प्रत्येक पैशासाठी घाम घालावा लागतो. काम केले तरच त्यांच्या घरची चूल पेटते. कोणतेही विकास काम माथाडी कामगाराच्या सहभागाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. ते काम बाजार समितीमधील असो गोदामातले असो कारखान्यातले असो किंवा रेल्वे माल धक्क्याचे असे असताना मात्र हमाल कष्टकऱ्यांची सर्व बाजूने कोंडी केली जात आहे.
राज्याच्या पणन संचालकांनी या हमाल – माथाडी कामगारांच्या अडीअडचणी समजून न घेता त्यांच्या हक्काच्या वाराई वर हातोडा चालवला आहे. यापुढे हमाल माथाडी कामगारांना केलेल्या कामाची वाराई मागता येणार नाही याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे. तसेच जे वाराई मागतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या सर्व प्रकाराविरुद्ध 19 जानेवारी रोजी मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने सकाळी 10.30 वाजता छत्रपती संभाजी नगर येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीवर निदर्शने करून सदरील परिपत्रकाची होळी करण्यात आली.
यावेळी हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे, मराठवाडा लेबर युनियनचे सरचिटणीस ऍड. सुभाष सावंगीकर, छगन गवळी, प्रवीण सरकटे, उत्तम नरवडे, नाझीम भाई, अली खान शेख रफिक आदींची उपस्थिती होती.