मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / तालुका प्रतिनिधी :-
सेनगाव – तालुक्यातील आजेगाव येथे आशा स्वयंसेविका एका पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. सदरील भरती प्रक्रियेत जास्त गुण असलेल्या महिला उमेदवारास दूर ठेवून उपसरपंच असलेल्या व्यक्तीच्या घरातील सदस्यास ग्रामपंचायतीने ठराव दिला संबंधित महिलेची निवड आरोग्य विभागाकडून आशा स्वयंसेविका या पदासाठी करण्यात आली आहे. या प्रकरणातील उपसरपंचासह तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावरही कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.
सेनगाव येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्याकडून जा. क्र.ता. आ. अ. का.से. /आस्था /कावी / 64/ दि.17 /03/2023 नुसार आशा स्वयंसेविका पदासाठी ग्रामपंचायतीकडून ठराव मागविण्यात आला होता. सदरील जागेसाठी आजेगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच यांच्या सुन व गावातील शालू अंकुश खंदारे या दोन महिलांची नावे पुढे आली होती.
सदरील अशा स्वयंसेविका पदासाठी महिलेचे शिक्षण किमान इयत्ता दहावी पास असावे तसेच सदर महिलेला दोन पेक्षा जास्त अपत्य नसावे, असे निकष तालुका आरोग्य अधिकारी यांच्या पत्रात आहेत.
या पदासाठी इच्छुक असलेल्या शालू अंकुश खंदारे या महिलेला इयत्ता बारावी मध्ये 61.23 टक्के गुण आहेत. तर उपसरपंचाच्या सुनेला 45.33 टक्के एवढे गुण आहेत. सदरील उमेदवारांचे शैक्षणिक गुण लक्षात घेऊन किंवा दोन्ही महिला उमेदवारांना ग्रामपंचायतीने ठराव देणे अपेक्षित होते.
मात्र ग्रामपंचायतीने उपसरपंचाच्या सुनेस या पदासाठी आवश्यक असलेला ठराव दिला. उपसरपंचाने आपल्या पदाचा गैरवापर करून घरातील व्यक्तीस सदरील पदासाठी आवश्यक असलेला ठराव ग्रामपंचायतीतून घेतला. तर शालू अंकुश खंदारे या महिला उमेदवारास सदरील भरती प्रक्रियेपासून दूर ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने ठरावच दिला नाही.
सदरील ठरावासाठी या महिला उमेदवाराने ग्रामपंचायत कार्यालयास अनेक चकरा मारल्या मात्र ठराव देण्यात आला नाही. तसेच आरोग्य विभागाकडूनही संबंधित उपसरपंचाच्या सुनेस संप काळात नियुक्ती देण्यात आली.
त्यामुळे या प्रकरणातील उपसरपंचासह तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर शासन नियमानुसार निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
तीन अपत्य असतानाही झाली नियुक्ती!
आजेगाव येथील आशा स्वयंसेविका पदासाठी निवड झालेल्या महिला उमेदवारास तीन अपत्य आहेत. असे असताना आरोग्य यंत्रणेकडून कुठलीही शहानिशा अथवा चौकशी न केल्याचे दिसते. निवड झालेल्या महिलेने तीन अपत्य पैकी एक अपत्य दत्तक दिल्याचे समजते. या संदर्भात ज्या ठिकाणी या महिलेचे तिसरे अपत्य शिक्षण घेत आहे त्या आजेगाव जि. प. कन्या प्राथमिक शाळा ठिकाणी माहिती अधिकाराखाली माहिती मागविली असता मागविलेला निर्गम उतारा ज्यांचा आहे त्यांना देता येतो वैयक्तिक उतारा असल्यामुळे तो संबंधिताशिवाय इतर कोणासही देता येत नाही, असे संबंधित अर्जदारास मुख्याध्यापक यांनी कळविले आहे.