मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी) परीक्षेला 21 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. 37 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असून 14 हजार 459 विद्यार्थी पेपर देणार आहेत. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) 21 फेब्रुवारी 2024 ते 19 मार्च 2024 या कालावधीत तसेच शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) 1 एप्रिल 2024 ते 26 एप्रिल 2024 या कालावधीत पार पडणार आहे. या परीक्षांच्या अनुषंगाने परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी नुकतीच जिल्हा दक्षता समितीची बैठक घेण्यात आली.
इयत्ता 12 वी परीक्षेसाठी जिल्ह्यात 37 परीक्षा केंद्र असून 14 हजार 459 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तसेच (इयत्ता 10 वी) परीक्षेसाठी जिल्ह्यात 54 परीक्षा केंद्र असून एकूण 16 हजार 245 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
सदरील परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी विभागीय मंडळ छत्रपती संभाजीनगर मार्फत जिल्ह्यात प्राचार्य (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण अधिकारी (योजना) व उपशिक्षणाधिकारी माध्यमिक या 5 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशान्वये परीक्षेचे संचालन सुयोग्य व्हावे व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत यासाठी परीक्षा चालू असताना परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहेत.
परीक्षा काळात गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहे.
बैठे पथक सदस्यांनी एक तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र तपासावयाचे आहे. प्रश्नपत्रिका आणण्यासाठी व उत्तर पत्रिका पर्यरक्षक कार्यालयात पोहोचविण्यासाठी सहायक परिरक्षकासोबत सुरक्षिततेसाठी पोलीस कर्मचारी असणार आहेत.
तसेच परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मोबाईल बंदी करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात पोलीस अधिनियम 37 (1) (3) व 144 कलम लागू करण्यात येणार आहे.
परीक्षा कालावधीत पर्यवेक्षणासाठी तालुका अंतर्गत पर्यवेक्षकांच्या शाळेत बदल करण्यात आला आहे. कर्मचारी यांनी परीक्षा कालावधीत परीक्षेच्या कामात हयगय किंवा हलगर्जी केल्यास कर्मचाऱ्याविरुद्ध कठोर कार्यवाही करण्याचेही आदेशित केलेले आहे.
परीक्षा केंद्रावर नक्कल आढळून आल्यास केंद्र संचालक पर्यवेक्षक हे जबाबदार असतील. या सर्वांनी परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी दक्षता घ्यावी असे आवाहन जि. प. माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी केले आहे.