Marmik
हिंगोली कानोसा

हिंगोली लोकसभा : जागा वाटपाचे अडले कुठे?

विशेष प्रतिनिधी :-

होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारांची यादी घोषित केली जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील महायुतीत सहभागी पक्षांना किती जागा द्यायच्या याबाबत वाटाघाटी सुरू आहेत. काही जागांची चित्र स्पष्ट होत असताना हिंगोली लोकसभेची जागा कोणाला सुटते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे...

होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आता निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील आणि अंदाजे उद्या दुपारी तीन नंतर निवडणुकांची आचारसंहिता लागू होईल. निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महायुतीतील जागावाटपांचे चित्र काही अंशी स्पष्ट झालेले असले तरी काही जागांवर महायुतीत सहभागी असलेले शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट काही जागांवर अडून बसलेले आहेत. असे असले तरी भाजप या दोन्ही पक्षांना 14 जागा (शिंदे गट 10) आणि (अजित पवार गट 4) व्यतिरिक्त जागा देणार नाही हे जवळपास निश्चित होत आहे. यामध्ये हिंगोली लोकसभेचा तिढा सुटता सुटेना झाला आहे.

मध्यंतरी महाराष्ट्रात केंद्रीय मंत्री अमित शहा येऊन गेले. त्यांची भेट महायुतीतील घटक पक्षांनी घेतली, काही जागांबाबत चर्चा निष्फळ झाल्याचे समजते. त्यापैकीच हिंगोली लोकसभेची जागा ही असू शकते! एवढे दिवस उलटून आणि लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता तोंडावर आलेली असताना महायुतीतील कोणत्या पक्षास ही जागा सोडायची हे कोडे सुटत नसल्याने हा विषय माध्यमांसह जिल्हावासीय आणि राज्यातील जनताही मोठ्या चवीने चर्वन करत आहे.

हिंगोलीची जागा भाजप मिळवणार –

महायुतीतील सहभागी शिवसेना (शिंदे गटाचे) प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंगोली लोकसभेची जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी कितपत इच्छुक आहेत हे कळण्यास मार्ग नाही खरे तर 10 मार्च रोजी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सदरील जागेबाबत अधिकृत घोषणा करणे गरजेचे होते; मात्र तसे काहीच झाले नाही. त्यांच्याही आधी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जनशताब्दी या विशेष रेल्वे गाडीला हिरवी झेंडी दाखवताना हिंगोली लोकसभेबाबत ठोस असे भाष्य केले नसले तरी उमेदवार कोणाचा जरी असला तरी प्रधानमंत्री मात्र नरेंद्र मोदीच होतील, असा विश्वास व्यक्त केला होता तर त्यांच्याही आधी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी याच रेल्वेगाडी बाबत पत्रकार परिषद घेऊन हिंगोलीची जागा महायुतीतील कोणत्याही पक्षाला सुटली तरी आम्ही युती धर्म पाळू असे सांगितले होते. तसेच त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जे ठरवतील ते आपणास मान्य राहील असेही सांगितले होते.

हिंगोलीची जागा कोणास सुटेल हे गृहीतक असले तरी सदरील जागाही भाजप मिळवणार असल्याचे राजकीय गोटातून आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही तज्ञ मंडळींकडून सांगितले जात आहे. तसेच याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसात होईल असेही सांगितले जात आहे. त्यामुळे सदरील जागा ही भाजप मिळवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

भाजपचा संभाव्य उमेदवार कोण ?

हिंगोली लोकसभेची जागा भाजपला मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झालेले आहे. याबाबतची घोषणा येत्या दोन दिवसात होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. असे असले तरी भाजपाकडून कोण उमेदवार दिला जाणार आहे याबाबतचे चित्र अजून स्पष्ट नाही. भाजपकडून सध्या रामदास पाटील सुमठाणकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांच्या पाठोपाठ श्रीकांत, विठ्ठलराव घुगे, रामराव वडकुते आणि तानाजी मुटकुळे यांची नावे पुढे येत आहेत. भाजप सदरील जागेसाठी रामदास पाटील सुमठाणकर यांनाच निवडणूक रिंगणात उतरवणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

रामदास पाटील सुमठाणकर किती योग्य – अयोग्य –

विश्वसनीय सूत्रांकडून भाजप पक्ष हिंगोली लोकसभेची जागा प्रामुख्याने रामदास पाटील सुमठाणकर यांच्यासाठी पक्षाकडे घेत असल्याचे सांगितले जात आहे. सदरील रामदास पाटील सुमठाणकर हे त्यांच्याच विधानसभा मतदारसंघात भ्रष्ट अधिकारी म्हणून ओळखले जातात असे सांगितले जात आहे. तसेच हिंगोली नगर परिषदेत असताना भूमिगत गटार योजनेत तसेच इतर काही योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे पक्षातीलच काही पदाधिकारी आणि संघातील जाणकारांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे ते निवडणूक रिंगणात उभे टाकल्यास विरोधकांना भ्रष्टाचाराचे आयते कोलीत सापडून ते हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आणतील ही भीती संघ परिवारातील तज्ञांना वाटते. तसेच त्यांना उमेदवारी दिली म्हणजेच ते निवडून येतीलच याबाबतही शंका – कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे भाजप हिंगोलीची जागा पक्षाकडे घेत असला तरी या जागेवरून स्थानिक आणि ‘निष्कलंक’ असलेला उमेदवार देणे गरजेचे आहे

…..म्हणून मोपलवारचे नाव पुढे –

हिंगोली लोकसभेसाठी भाजपकडून मुख्यमंत्री वॉर रूमच्या महासंचालक पदाचा राजीनामा देऊन राजकारणात येऊन हिंगोली अथवा नांदेड लोकसभा निवडणुक लढविण्याचा मनसुबा बाळगणारे राधेश्याम मोपलवार यांचे नाव हिंगोली लोकसभेसाठी पुढे येऊ लागले होते; मात्र सदरील जागा ही भाजप सुटणार असल्याने मोपलवार यांना हिंगोली लोकसभेपासून दूर ठेवले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले; मात्र सदरील जागा ही शिवसेना (शिंदे गट) यांना सुटली असती तर आणि विद्यमान खासदार हेमंत पाटील हेच जर निवडणूक रिंगणात असते तर त्यांना येथे आणले जाऊ शकले असते असे सांगितले जात आहे.

आघाडी आणि अन्य पक्षांचे काय?

भाजपकडून ज्या पद्धतीने केंद्रातील संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. त्यास तोडीस तोड अथवा प्रतिउत्तर म्हणून महाविकास आघाडी कडून तशा पद्धतीने उमेदवार यादी घोषित केली जात नाही. त्यातही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे न्यायालयात गेलेले असल्याने ते या निवडणुकीत कितपत सक्रिय राहतील याबाबतच साशंकता आहे. तर हिंगोली लोकसभेसाठी काँग्रेस उमेदवार देईल का हेही स्पष्ट झालेले नसल्याचे दिसते. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम तसेच इतर पक्षांकडूनही अद्याप उमेदवारांची नावे घोषित करण्यात आलेली नाहीत…

Related posts

पाटलांचे ‘रामदासी’ ‘कवित्व’, निवडणुकीचा कंडू शमला!

Gajanan Jogdand

शिवसेनेकडून आता बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी

Gajanan Jogdand

हिंगोलीत आष्टीकर आघाडीवर तर जालन्यात दानवे, पंकजा मुंडे पिछाडीवर

Santosh Awchar

Leave a Comment