गमा
भारतासारख्या लोकशाही देशात मतदानाचे प्रमाण कमी असणे ही चिंतेची बाब. ते वाढविण्यासाठी प्रयत्न करणे हे स्तुत्य; मात्र केंद्रातील भाजप पक्षाच्या संकल्प यात्रेप्रमाणेच आई-बाबांना ‘संकल्प पत्र’ हा उपक्रम राबवून संबंधित पक्षाच्या उमेदवारास अप्रत्यक्षपणे त्याचा लाभ मिळवून दिला जात आहे की काय? असा प्रश्न सुज्ञ मतदारास पडावा. हा आचारसंहितेचा भंग नव्हे काय? असाही प्रश्न पडावा. मिशन डिस्टिंक्शन हा उपक्रम याच नावे कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे…
मागील लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण लक्षात घेता 75 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान व्हावे या उद्देशाने स्वीप अंतर्गत #missionDistinction75 % हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या अंतर्गत प्रत्येक गाव, शहर, वाडी, वस्ती या ठिकाणच्या मतदारांमध्ये मतदानाची जनजागृती व्हावी यासाठी सर्व महाविद्यालय शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचे मी व माझे कुटुंबीय मतदान करणारच असे संकल्पपत्र 1 एप्रिल 2024 रोजी एकाच दिवशी भरून घेण्यात येणार आहेत.
या संकल्प पत्रात ‘आम्ही हा संकल्प करतो की, 26 एप्रिल 2024 रोजी हिंगोली लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आम्ही अवश्य जावू आणि आमचा मतदानाचा हक्क बजावू.
तसेच भावनिक साद घालत परिवारातील सर्व मतदारांना शेजाऱ्यांना, मित्रांना मतदान करण्यासाठी प्रेरित करू असे या ‘संकल्प पत्रा’त नमूद करण्यात आले आहे ही ‘संकल्प पत्रे’ संबंधित शाळेत विद्यार्थी जमा करणार आहेत, असे जिल्हा माहिती कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
खरे तर मतदान करणे हा काही ‘संकल्प’ नव्हे तर तो हक्क आहे. अधिकार आहे आणि नुसता अधिकारच नव्हे तर मूलभूत अधिकार आहे. ही बाब प्रशासनाला माहिती नसावी हेही एक कोडेच! खरे तर निवडणूक कार्यक्रमाच्या आधी माजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारात विकसित भारत संकल्प यात्रा राबविण्यात आली होती.
या यात्रेदरम्यान नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती पुरविण्यात आली होती. तसेच सदरील संकल्प यात्रेदरम्यान केंद्रातील विविध मंत्र्यांना विविध राज्यात पाठविण्यात आले होते.
या संकल्प यात्रेवरूनच आता चक्क शालेय विद्यार्थ्यांकडून आई-बाबांना ‘संकल्प पत्र’ भरून घेतला जाणार आहे असेच वाटावे ते संकल्प या नावावरून! मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचेच; मात्र कोणत्याही पक्षाला तसेच पक्षाच्या उमेदवाराला त्याचा फायदा होता कामा नये… मतदान प्रक्रिया ही निःपक्ष व्हायला हवी…
संकल्प यात्रा या उपक्रमावरून ‘संकल्प पत्र’ हा उपक्रम राबवून अप्रत्यक्षपणे माजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्प यात्रेला उजाळा देणे असेच एखाद्या सुज्ञ मतदाराला वाटावे. कमीत कमी ‘संकल्प पत्र’चे नाव बदलून दुसरे काहीतरी असायला हवे…