Marmik
Hingoli live

हिंगोलीच्या तापमानाने चाळिशी ओलांडली! नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – सध्या उन्हाळा  सुरु असून, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. हिंगोली च्या तापमानाने चाळीशी केव्हाच ओलांडली असून मार्च अखेरपर्यंत तापमान 42 अंशावर गेले आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तींला  उष्माघात होण्याची शक्यता असल्याने तीव्र उन्हात फिरु नये. तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी,  असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे. 

हिंगोली जिल्ह्यामध्ये कडाक्याच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा 42 अंशापर्यंत पोहचत आहे. आताच मार्च अखेर शहरातील तापमान 42 अंश इतके झाले आहे. त्यामुळे उष्माघाताचा लोकांना त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये येथे उष्माघात कक्ष सुरु केले आहेत. 

प्रत्येक कक्षात लागणाऱ्या प्राथमिक गरजेची पूर्तता करण्यात आली आहे. सध्या शेतीची कामे सुरु असून शेतमजूर आणि शेतकरी उन्हाची पर्वा न करता शेतात राबतात. त्यामुळे त्यांना उष्मघाताचा फटका बसण्याची सर्वाधिक शक्यता असते. अशा रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी आरोग्य विभागाने जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे,

 ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालये येथे स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरु केले आहेत. आरोग्य केंद्रात उष्माघात कक्षात रुग्णांसाठी बेड, कुलर, थंड पाण्याची व्यवस्था, फॅन यासह औषधोपचारासाठी आवश्यक असलेली सर्व सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच वाढत्या उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या आजारांसह होणारे दुष्परिणामाबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे.

उष्माघात होण्याची कारणे :

शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीचे व कष्टाची कामे करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संपर्क येण्याने उष्माघात होऊ शकतो.

लक्षणे :

मळमळ, उलटी, हात पायात गोळे येणे, थकवा येणे, 40 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे क्वचित लाल होणे, घाम न येणे, डि-हायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्त दाब वाढणे, मानसिक अस्वस्थ, बेशुद्धवस्था इ. अति जोखमीच्या व्यक्ती बालके, लहान मुले, खेळाडू,

 सतत उन्हात काम करणाऱ्या व्यक्ती, वयस्कर व्यक्ती ज्यांना हृदय रोग, फुप्फुसाचे विकार, मूत्रपिडाचे विकार.

प्रतिबंधात्मक उपाय :

वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळणे. शक्य नसल्यास थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावे. कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत. उष्णता शोषून घेणारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे) वापरु नयेत. सैल पांढरे किंवा फिक्कट रंगाचे सूती कपडे वापरावेत.  तीव्र उन्हाच्या वेळेस बाहेर जाणे टाळावे. बाहेर प्रवासाला जाताना पाणी सोबत ठेवावे. पाणी भरपूर प्यावे. डि-हायड्रेशन होऊ देऊ नये, लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी इत्यादी प्यावे. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्री इत्यादीचा वापर करावा. घरामध्ये कामाच्या ठिकाणी कुलर्स, एअर कंडिशनर्स, वाळ्याचे पडदे यांचा वापर करावा. पार्क केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा पाळीव प्राण्याना सोडू नका. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा.

उपचार :

रुग्णास प्रथम सावलीत आणावे, रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी त्वरित उपचार सुरु करावेत, रुग्णाचे कपडे सैल करुन त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे. रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर्स, एअर कंडिशनर्स त्वरित चालू करावेत. रुग्ण शुद्धीवर असल्यास त्यास थंड पाणी, जल संजीवनी द्यावे व डि-हायड्रोशन टाळावे. चहा, कॉफी देवू नये . रुग्णाच्या काखेखाली आइस पॅक ठेवावेत, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्टया ठेवाव्यात. थर्मामीटरने रुग्णाचे तापमान बघत राहावे व 36.8 सेल्सिअस तापमान होईपर्यंत वरील उपचार चालू ठेवावेत. नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. रुग्णास रुग्णालयात भरतीची गरज पडल्यास 108 या निशुल्क क्रमांकावर ॲम्बुलन्ससाठी कॉल करावा, असे आवाहन  जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले आहे.

Related posts

बकरी ईद : शहरातील वाहतुकीत बदल

Santosh Awchar

शेतमालावरील वायदे बंदी उठवा अन्यथा 23 जानेवारीपासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा; शेतकरी संघटनेचे राज्यव्यापी धरणे आंदोलन

Santosh Awchar

आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत कळमनुरी येथे रामचंद्र सात महाराज यांचा पालखी सोहळा भक्तीभावात साजरा

Santosh Awchar

Leave a Comment