मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-
हिंगोली – महायुतीकडून अधिकृतपणे शिवसेना पक्षाच्या उमेदवारास उमेदवारी मिळाली असली तरी भाजपचे कार्यकर्ते रामदास पाटील सुमठाणकर यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे समजते. त्यामुळे भाजपत फूट पडली की महायुतीत हे कळण्यास मार्ग नाही..
हिंगोलीची जागा कोणत्या कोणत्या पक्षास सोडावी यावरून महायुती कडून मोठा कालावधी घेण्यात आला. परंतु सदरील जागा ही शिवसेनेची असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षासाठी सोडण्यात आली शिवसेनेकडून हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.
मात्र या उमेदवारी विरुद्ध स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी मोठा विरोध केला. त्यामुळे शिवसेनेला आपला उमेदवार बदलावा लागला. आज 4 एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
मात्र त्या आधीच सकाळच्या सत्रात भाजपचे रामदास पाटील सूमठाणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांनी बंडाचे निशाण रोवले असून त्यांना पाठिंबा कोणाचा असा प्रश्नही आता महायुतीतील पदाधिकाऱ्यांना पडू लागला आहे.
रामदास पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपत फूट पडली की महायुतीत? असा प्रश्नही पडू लागला आहे. त्यांचे बंड कशा पद्धतीने शमविले जाते किंवा रामदास पाटील हे निवडणूक लढवतात, त्यांच्यावर पक्षाकडून काय कार्यवाही होते हे पाहणे औचित्याचे ठरेल..
रामदास पाटील होते प्रबळ दावेदार
महायुतीतील भाजपस हिंगोली लोकसभेची जागा सुटली असती तर रामदास पाटील सुमठाणकर हे प्रबळ दावेदार होते. त्यांच्या या प्रबळ दावेदारीमुळे हिंगोली लोकसभा जागेचा तिढा सुटत नव्हता; मात्र ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षास सुटली. त्यामुळे रामदास पाटील सुमठाणकर हे नाराज होते असे समजते. आता त्यांच्या मागे पक्षातील कोण – कोण जातो हे पाहणे अधिक सोयीचे ठरेल.