मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील भाजपाचे कार्यकर्ते भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सेवानिवृत्ती घेतलेले रामदास पाटील यांनी हिंगोली लोकसभा निवडणुकीतून अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे समजते. आता त्यांना युती धर्माची जाणीव झाली हे विशेष!
हिंगोली लोकसभेची जागा मिळवण्यात महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मोठी रस्सीखेच झाल्याचे पाहायला मिळाली. अखेर ही जागा शिवसेनेची असल्याने शिंदे गटास सोडण्यात आली भाजपस ही जागा सुटली असती तर भाजपकडून रामदास पाटील हे प्रबळ दावेदार मानले जात होते. निवडणुकीच्या अनुषंगाने पाटील यांनी मागील दोन ते अडीच वर्षांपासून कामास सुरुवात केली होती यात त्यांचा मोठा खर्चही झाला. तसेच वेळही गेला!
मात्र ही जागा शिवसेना शिंदे गटास सुटली शिंदे गटाकडून हेमंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली याबाबत ‘मार्मिक महाराष्ट्र’शी रामदास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तेव्हा त्यांनी आपण महायुती धर्म पाळणार असल्याचे सांगितले होते आपण पक्षाचा कार्यकर्ता असून यापुढेही कार्यकर्ता म्हणूनच काम करू असेही तेव्हा सांगितले होते.
मात्र व्हाट्सअप सारख्या काही सोशल माध्यमांवर रामदास पाटील हे खासदार झाले पाहिजेत अशी ‘जनहित मागणी’ करणारे संदेश पाठवले गेले आणि पुढे रामदास पाटील यांनी बंडखोरी पुकारली.
पाटील यांनी बंडखोरी करून आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. आमदार सोडल्यास आपल्याकडे पक्षाचे किती कार्यकर्त्यांनी माणस आहेत हे ते प्रसारमाध्यमांना दाखवू लागले. तसेच आता माघार नाही, अशा बातम्याही प्रसारित झाल्या!
त्यानंतर ‘क्यू पडे हो चक्कर में यहा कोई नही है टक्कर मे’, ‘युवा मतदारांचा युवा खासदार (युवा पर्व)’, ‘हिंगोलीच्या विकासाची तळमळ जनहिताची चळवळ’, असे व्हाट्सअपी मेसेज फिरवण्यात आले. व्हाट्सअप वर दोन दिवस हे मेसेज फिरले. आणि आज त्यांची ही ‘जनहिताची चळवळ’ त्यांनी थांबवून माघार घेतली. त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते हिंगोलीत दाखल झाले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
तसेच युती धर्माचा साक्षात्कारही त्यांना झाला! पक्षात राहून मित्र पक्षाच्या एका उमेदवारास बदलून त्याच्या जागी दुसरा उमेदवार आणल्यानंतरही अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. खरे तर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई व्हायला हवी होती; मात्र असे भ्रष्ट आणि अवसानघातकी माणसं भाजपस हवेहवेसे वाटू लागल्याचे पाहायला मिळत आहे. असो. हा प्रश्न त्या पक्षाचा.
मात्र तूर्त पाटलांचे हे ‘रामदासी’ काव्य जवळपास संपुष्टात आले असून त्यांचा लोकसभा निवडणुकीचा कंडूही शमल्याचे यावरून दिसते.