मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
परभणी – तालुक्यातील जांब येथील साबळे परिवाराने लग्नाच्या पत्रिकेवर पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या ‘दृष्टीने झाडे लावा झाडे जगवा’ चा संदेश दिला आहे. तसेच ‘अज्ञानातच आपली अधोगती शिकण्यातच आहे खरी प्रगती’ असाही संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे साबळे परिवाराच्या या पत्रिकेची जिल्हाभरात चर्चा आणि कौतुक होत आहे.
परभणी पासून 10 कि.मी. अंतरावर असलेल्या जांब येथील मारोती मुगाजी साबळे यांचे सुपुत्र अरुण सावित्रीबाई मारोती साबळे व सोनपेठ तालुक्यातील खडका येथील निकिता अंतिका रमेश मोरे यांचा विवाह मे महिन्यातील 2 तारखेस आहे.
मारोती साबळे हे होमगार्ड मध्ये कार्यरत होते. त्यामुळे त्यांचा सामाजिक कार्यात सतत सहभाग राहिलेला आहे. त्यांचा हा वारसा त्यांची मुले ज्ञानेश्वर सावित्रीबाई मारुती साबळे (होमगार्ड) व अरुण सावित्रीबाई मारुती साबळे (टेक्निशियन मेट्रो रेल्वे मुंबई) हे पुढे नेत आहेत. त्यांचे सुपुत्र अरुण साबळे हे मुंबई येथे मेट्रो रेल्वेत टेक्निशियन म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा विवाह सोहळा मे महिन्यातील दोन तारखेस आहे.
अरुण सावित्रीबाई मारोती साबळे हेही सामाजिक कार्यात सतत सहभाग घेत असतात. त्यांनी ‘सेफ विंग’च्या माध्यमातून अनेक निराश्रीत बालकांना आर्थिक सहाय्य करून त्यांच्या शिक्षणासाठी मोलाचा वाटा उचलत आहेत.
‘सेफ विंग’च्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात ते हिरीरीने सहभाग घेत असतात. त्यांना लहानपणापासून पर्यावरण आणि सामाजिक कार्याची आवड आहे. ही आवड त्यांनी कायम जोपासली आहे. त्यांनी आपल्या लग्न पत्रिकेवर पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने ‘झाडे लावा झाडे जगवा’ चा संदेश दिला आहे. तसेच ‘अज्ञानात आपली अधोगती शिक्षणातच आहे प्रगती’ असा संदेशही दिला आहे.
सध्या लोकशाहीचा लोकोत्सव सुरू आहे. तसेच लग्नसराई ही सुरू आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत आहे. तसेच वाढत्या तापमानाचा पारा चढत राहत आहे. मागील महिन्यात तापमान 42 अंश सेल्सिअस वर गेले होते तर या महिन्यात तापमानासह प्रचंड उकाडा वाढत आहे.
झाडांची झालेली कत्तल यास कारणीभूत असून मोठ्या प्रमाणात जमीन झाडांच्या आच्छादनापासून मुक्त झाले आहे. त्याचा परिणाम सर्वांना भोगावा लागत असून पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाचे काम होणे आता गरजेचे झाले आहे. त्यासाठी झाडे लावणे हा एकमेव पर्याय आहे. या दृष्टीने साबळे कुटुंबाने आपल्या लग्न पत्रिकेवर ‘झाडे लावा झाडे जगवा’ चा संदेश दिला आहे. त्यामुळे या लग्नपत्रिकेची जिल्हाभरात चर्चा आणि कौतुक होत आहे.