मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यातील सेनगाव ग्रामपंचायतचा अनागोंदी कारभार पुढे येत आहे. पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींनी ग्रामसभेच्या प्रत्येक सभेचे कार्य वृत्तांताचे अभिलेखे हे सेनगाव पंचायत समितीकडे उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे. त्यामुळे या पंचायत समितीत जाब विचारणारा कोणी आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सेनगाव तालुक्यातील कहाकर येथील एडवोकेट मधुकर प्रल्हाद कांबळे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 7 (11) प्रमाणे पंचायत समिती सेनगाव अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींनी 1 जानेवारी 2012 पासून 15 डिसेंबर 2023 पर्यंत दाखल केलेल्या प्रत्येक सभेचे कार्य वृत्तांत अभिलेखासाठी पंचायत समितीकडे सुपूर्त केले त्या अभिलेखाची प्रत मागविली होती.
त्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 7 (11) प्रमाणे सेनगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने प्रत्येक ग्रामसभेचे कार्य वृत्तांत हे त्या – त्या सर्कल मधील विस्तार अधिकारी (पंचायत) यांच्याकडे देणे गरजेचे आहे. परंतु ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे कार्य वृत्तांत हे त्या – त्या सर्कलमधील विस्तार अधिकारी (पंचायत) यांच्याकडे दिल्याचे या कार्यालयाकडे कोणतेही अभिलेखे उपलब्ध नाहीत, असे उत्तर देण्यात आले आहे.
तसेच सदरील कालावधीत ज्या ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या प्रत्येक सभेचा कार्य वृत्तांत दाखल केला नाही त्यांच्याविरुद्ध आपल्या स्तरावरून कोणती कार्यवाही केली गेली त्या कार्यवाहीची नक्कल देण्यात यावी. तसेच कार्यवाही केले नसल्यास का केले नाही, याबाबत खुलासा मागविला होता.
त्यावर संबंधित कालावधीत ज्या ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या कार्यवृत्तांत दाखल केला नाही त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करण्याचे अधिकार हे त्या – त्या सर्कलचे विस्तार अधिकारी (पंचायत) यांच्यामार्फत विभाग प्रमुख कार्यवाही करतील व ही कार्यवाही आस्थापना (पंचायत) यांच्याशी निगडित असल्याने याबाबतची माहिती आपण स्वतंत्र अर्ज करून आस्थापना पंचायत यांच्याकडून प्राप्त करून घ्यावी, असे उत्तर देण्यात आले होते.
तसेच दि. 1 जानेवारी 2012 पासून 5 मार्च 2024 पर्यंत पंचायत समिती सेनगाव अंतर्गत येणाऱ्या ज्या ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या प्रत्येक सभेचा कार्यवृत्तांत अभिलेखासाठी पंचायत समितीकडे सुपूर्द केला नाही त्याविरुद्ध आपल्या पंचायत समिती स्तरावरून काही कार्यवाही करण्यात आली आहे का? अशी विचारणा केली असता त्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 7 (11) प्रमाणे ग्रामपंचायतीने प्रत्येक ग्रामसभेचा कार्यवृत्तांत हे त्या – त्या सर्कलमधील विस्तार अधिकारी पंचायत यांच्याकडे देणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास त्या ग्रामपंचायत विरुद्ध कार्यवाही करण्यासाठी प्रस्तावित करणे ही त्या सर्कलच्या विस्तार अधिकारी (पंचायत) यांची जबाबदारी आहे. परंतु विस्तार अधिकारी यांनी अशा प्रकारची कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही, असे उत्तर देण्यात आले आहे.
तसेच कार्यवाही केली असल्यास सदर कार्यवाहीची चौकशी अहवाल याची परत देण्यात यावी अशी मागणी केली असता कार्यवाही केल्याचे दिसून येत नसल्याने प्रश्नच उद्भवत नाही, असे उत्तर देण्यात आले आहे.
यावरून सेनगाव पंचायत समितीवर अधिकाऱ्यांचे कोणतेही अंकुश नसल्याचे दिसून येत असून विद्यमान आमदार यांचेही लक्ष नसल्याचे दिसते. या सर्व प्रकाराने सेनगाव पंचायत समितीचा कारभार राज्यात मोठ्या चवीने चर्चिला जात आहे.