मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यातील वसमत शहरातील एका व्यक्तीच्या घरी कोणीच नसल्याची संधी साधून त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या – चांदीचे दागिने चोरी करणारे आंतर जिल्हा घरफोडी गुन्ह्यातील दोघांना हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी पकडून गजाआड केले आहे. यावेळी आरोपींकडून 29 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 60 तोळे वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरील टोळीने हिंगोली व नांदेड जिल्ह्यात याआधी घरकुल केलेली आहे.
वसमत शहर पोलीस ठाणे हद्दीत जवाहर कॉलनीत वास्तव्यास असलेले जिबुद्दीन सिद्दिकी यांच्या घरी कोणीच नसल्याचे संधी साधून अज्ञात आरोपींनी घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने चोरी केले होते. याबाबत फिर्यादी यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात 29 फेब्रुवारी 2024 रोजी भादंवी नुसार पुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच वसमत शहरातील राजाभाऊ सौंदणकर (रा. मंगळवार पेठ) यांच्या घरीही कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात आरोपींनी नगदी रुपये व चांदीचे दागिने चोरून नेल्याबाबत वसमत शहर पोलीस ठाण्यात 10 मे 2024 रोजी भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरील गुन्हे तात्काळ उघड करून गुन्ह्यातील आरोपीस पकडून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश देऊन मार्गदर्शन केले होते.
स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू व त्यांच्या तपास पथकाने सदर घटनास्थळी व परिसरास भेट देऊन तपास केला असता गोपनीय बातमीदार व रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासात कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करून नमूदचे गुन्हे हे अट्टल गुन्हेगार असलेले व ज्यांच्यावर यापूर्वी हिंगोली व नांदेड जिल्ह्यात घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असलेले नामे रमेश सुरेश गायकवाड (रा. गणेशपुर ता. वसमत), रतनामसिंग गुरमुखसिंग चव्हाण (रा. वसमत शहर) यांनी केल्याबाबत निष्पन्न झाले.
नमूद दोन्ही आरोपींना अतिशय सिताफिने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तपासात आरोपींकडून पुढील प्रमाणे वसमत शहर पोलीस ठाणे हद्दीतील घरकुलचे गुन्हा उघड करून सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.
त्याचे वर्णन पुढील प्रमाणे गुरनं 115 / 2024 कलम 454, 457, 380 या गुन्ह्यात 15 ग्राम वजनाचे सोन्याचे गलसर, 6 ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन, 7 ग्रॅम वजनाची सोन्याचे कानातले रिंग, दोन ग्रॅम वजनाचे गुलबी मनी असलेले मंगळसूत्र, 10 तोळे चांदीची चैन.
गुरनं 258/ 2024 कलम 457, 380 या गुन्ह्यातील 20 तोळे चांदीचे दोन चैनीचे जोड, 15 तोळे चांदीचे पायातील जोडवे 15 नग, 15 तोळे वजनाचे चांदीचे कडे व बिनले/वाळे, असा एकूण गुन्ह्यातील मिळून वरील प्रमाणे चोरून नेलेले सोन्याचे 29 ग्रॅम वजनाचे दागिने व चांदीचे 60 तोळे वजनाचे दागिने किंमत 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार शेख बाबर, गजानन पोकळे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, ज्ञानेश्वर पायघन, तुषार ठाकरे, दत्ता नागरे यांनी केली.